facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / तुम्ही प्रेम करता म्हणून मी आहे

तुम्ही प्रेम करता म्हणून मी आहे

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘रसिकांनी आजवर दिलेल्या प्रेमामुळेच मला ऊर्जा मिळाली. ८३ वर्षांची झाले; पण आजही ३८ वर्षांची वाटते. तुम्ही प्रेम करता म्हणून मी उभी आहे. तुमचे प्रेम कमी झाले तर मी उभी राहू शकणार नाही,’ अशा भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.
पुणे भारत गायन समाजातर्फे भोसले यांना पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते सन्मा‌नित करण्यात आले. त्या वेळी त्यांनी रसिकांशी संवाद साधला. पं. हृदयनाथ मंगेशकर, पुणे भारत गायन समाजाच्या अध्यक्षा शैला दातार, प्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके आदी या वेळी उपस्थित होते.
‘प्रत्येक कलाकार रसिकांच्या प्रेमावर उभा राहतो. प्रेम कमी झाले तर तो उभा राहणार नाही. मी १२०० मराठी गाणी गायली, आजही सलग तीन तास गाऊ शकते. लतादीदी आणि बाबांच्या कृपेमुळे हे शक्य आहे. पं. राम मराठे यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. कधी कधी आपण खरेच त्याच्या लायक आहोत का, असा प्रश्न पडतो. मी खरे बोलते. अनेकदा लोकांना ते आवडले नाही, पण आता मात्र ते लोकांना पटू लागले आहे. माझे प्रेम कुणाला कळले नाही, माझ्या मुलांना देखील कळले नाही; पण तुम्हा रसिकांना ते कळले असेल,’ असे सांगत भोसले यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. ‘शूरा मी वंदिले…’ या गाण्याच्या ओळी गात त्यांनी रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली.
‘मंगेशकर आणि पुरंदरे ही आडनावे जरी वेगवेगळी असली, तरी कुटुंब एक आहे,’ असे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आशा जितकी खेळकर, थट्टेखोर आहे; तितकीच ती कडक देखील आहे. तिच्यावर बरंच काही लिहिण्यासारखं आहे आणि ते मी लिहिणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांच्या सहवासातून जो आनंद मिळाला, तो जन्मभर कमी होणार नाही,’ असे पुरंदरे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शैला दातार आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *