facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / जळगाव / पैशासाठी लग्नपत्रिकांसह अर्ज

पैशासाठी लग्नपत्रिकांसह अर्ज

गेले दहा दिवस बँकांसमोर दिसत असलेली रांग आता नाहिशी झालेली आहे. एटीएमसमोर मात्र, रांग दिसत आहे. घरात तोंडावर लग्न आलेल्या घरातील कर्त्या पुरुषांचे मात्र, बँकेत पैसे मिळण्यासाठी आर्जवे सुरू आहेत. काही बँकांनी सहकार्य केले आहे तर काहींनी आरबीआयच्या परिपत्रकाची वाट पाहत असल्याचे सांगितले.

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्या बँकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये अभूतपूर्व गर्दी झालेली होती. आज दहा दिवसांनंतर ही गर्दी बरीचशी नियंत्रणात आलेली दिसली. बोटांना लावण्यात येणारी शाई अणि काळा पैसा इतरांच्या खात्यात जमा केल्यास होणारी शिक्षा यांचा एकत्रित परिणाम म्हणून ही गर्दी ओसरल्याचे सांगण्यात आले. सोमवारीदेखील बाद चलन बँकांमध्ये भरण्यासाठी, तसेच रकमा काढण्यासाठी गर्दी होती. २४००० पर्यंत रकम देत असल्याचे बँक ऑफ इंडियाच्या रिंगरोड शाखेचे व्यवस्थापक प्रकाश सपकाळे यांनी सांगितले. आपल्याकडे चार ग्राहकांनी घरात लग्न असल्याने जादा रकमेसाठी अर्ज व पत्रिका देऊन मागणी केली आहे, मात्र रिझर्व्ह बँकेचे एकदम इतकी रक्कम देण्याचे आदेश नसल्याने आदेशाची वाट पाहत असल्याचे सपकाळे यांनी सांगितले. जळगाव पीपल्स बँकेत एक अत्यंत गरजू, घरात लग्न ठरलेले असा ग्राहक आला आणि पैसे मिळण्याबाबत गयावया करू लागला. अशावेळी बँकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने आचारी, घोडेवाला, मंडपवाला आणि इतरांना बोलावून त्यांना पैसे देत या ग्राहकाला दिलासा दिला. जनता बँकेनेदेखील शनिवारी असेच कामगारांचे अडकलेले पेमेंट केले आणि ग्राहकांना दिलासा दिला. सध्या प्रत्येक बँकेत लग्नासाठी रक्कम काढायची म्हणून मागणी येत आहे. आज एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी रांगा दिसत होत्या. दरम्यान, पैसे काढण्यासाठी किंवा त्यांचा भरणा करण्यासाठी होत असलेल्या रांगा अजून दोन ते तीन दिवस कायम राहतील, असा अंदाज आहे.

शुभ मुहूर्तांवर लग्नकार्यांचा धुमधडाका

तुळशीच्या लग्नापासून सुरू झालेल्या लग्नतिथींमधील सर्वात शुभ मुहूर्त सोमवारी, असल्याने जळगाव शहरात लग्नकार्यांचा धुमधडाका उडाला होता. या दिवशी ३० ते ३५ मंगलसोहळे जळगाव शहरात पार पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. सोमवारी २१ नोव्हेंबरचा शुभ मुहूर्त असल्याने लग्नकार्य व मंगलकार्यांची दांडगी तिथी होती. त्यामुळे जळगाव शहारात ठिककिकाणी वऱ्हाडींची गर्दी दिसत होती. चिमुकले राम मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, शाहुनगर हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर यांचे पार नवरदेव व त्याच्या सोबतच्या वऱ्हाडींनी फुलले होते. मंदिराकडे जाणारे रस्ते मिरवणुकांनी गजबजले होते. शहरात मंगल कार्यालये, लॉन्स, छोटे हॉल आदी मिळून ४५ सभागृहे आहेत. तेही हाऊसफुल्ल होते. हॉल न मिळालेल्यांनी ओपन स्पेसमध्येही लग्नसोहळे आयोजित केले होते. पुरोहित, बॅण्डपथक यांचे जोरदार बुकिंग होते. या सोहळ्यांमुळे रेल्वे व एसटीमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी होती.

पतसंस्थांना मोठ्या नोटांची परवानगी मिळावी

राज्याच्या विकासात पतसंस्थांचे योगदान लक्षात घेऊन पतसंस्थांना कर्ज वसुलीसाठी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी द्यावी, तसेच पतसंस्थांना त्यांच्या खात्यातून व बँकांमधून आवश्यकतेनुसार पैसे काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन समितीच्या बैठकीत करण्यात आली. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला हे होते. प्रदेश उपाध्यक्ष प्रा. डॉ. मुकुंदराव तापकीर, संघटन प्रमुख दीपक देशपांडे, सहसंघटनप्रमुख दिलीप पाटील, विदर्भातून नीळकंठ देवांगण, पराग देवपुजारी आदी उपस्थित होते. पतसंस्थांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या अधीन राहून कर्जापोटी मोठ्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्यास त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रत्यक्ष भेटून द्यायचे ठरले. येत्या २४ व २५ डिसेंबरला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बैठका होणार असून, त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. ३० नोव्हेंबरला प्रशिक्षण वर्ग नाशिक येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *