facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याचे वरदान

यंदा रब्बी हंगामासाठी पाण्याचे वरदान

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर रब्बी पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा व करडई या प्रमुख पिकांची पेरणी सुरू असून, ज्वारीचे क्षेत्र तुलनेने वाढण्याची शक्यता आहे. कमी पाऊस पडलेल्या भागात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.
रब्बी पेरणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे पेरणीचा वेग वाढला आहे. रब्बी ज्वारी प्रमुख पीक असून, जिल्ह्यात ९१ हजार १४८ हेक्टर क्षेत्र आहे. सध्या ४१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून गव्हाचे क्षेत्र घटले होते. पाणी नसल्यामुळे बागायती क्षेत्र अत्यंत कमी होते. यावर्षी बागायती क्षेत्रात तुलनेने वाढ झाली आहे. जिल्ह्यात गव्हाचे एकूण क्षेत्र ४३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत ५५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. काही भागात हरभरा पिकाची पेरणी वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६१ टक्के पेरणी झाली आहे. हरभरा पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे. तीळ, करडई, जवस, सूर्यफूल या गळीत धान्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर आहे. करडईचे सर्वाधिक क्षेत्र असून चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. पाण्याची पाळी देणे शक्य असलेल्या ठिकाणी गव्हाचे पीक घेण्याचा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. खरीप हंगाम जास्तीच्या पावसाने हातचा गेला आहे. कापूस, सोयाबीन या पिकांचे अतोनात नुकसान झाले. वाहून गेलेली पिके मोडून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीची तयारी केली. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेरपर्यंत गव्हाची पेरणी करता येईल. बहुतेक ठिकाणी मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगाम फायदेशीर ठरणार आहे.

फळबागांना फायदा
दुष्काळात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील फळबागा जळाल्या होत्या. या बागा तोडून शेतकरी रब्बीची पिके घेत आहेत. विहिरी व तलावात पाणी असल्यामुळे फळबागा आणि ऊस लागवड वाढण्याची शक्यता आहे. कारखान्याला ऊस देण्यापेक्षा काही शेतकरी बेणे विकत आहेत. बेण्याचा प्रतिगुंठे दर असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळत आहे. पुढील वर्षी उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

रब्बीचे क्षेत्र
जिल्हा………….टक्के
औरंगाबाद…….५१.२९
जालना…………८७.२९
बीड……………९१.०५
लातूर…………..१०८.३८
उस्मानाबाद……४८.८५
नांदेड………….५२.८०
परभणी………..५९.६५
हिंगोली………..४७.१४
(पेरणीचे एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये)

पुरेसा पाऊस पडलेल्या तालुक्यात रब्बी पिकांची स्थिती चांगली आहे. गंगापूर, वैजापूर आणि पैठण तालुक्याच्या काही भागात रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारी, हरभरा व गहू या पिकांचे चांगले उत्पादन होईल.
– डॉ. एस. बी. पवार, कृषीविद्यावेत्ता

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *