facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / अहमदनगर / रब्बी पिकांसाठी कुकडी, सिनाचे आवर्तन मिळावे

रब्बी पिकांसाठी कुकडी, सिनाचे आवर्तन मिळावे

यंदा तालुक्यात रब्बी पिकांची विक्रमी पेरणी झाली असून या पिकांसाठी कुकडी व सिना लाभक्षेत्रामध्ये आवर्तन सोडण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. कुकडी व सिनामध्ये या वेळी आणखी किमान तीन आवर्तने होतील, एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी ताताडीने सल्लागार समितीची बैठक बोलावण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगांदे, कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना मिळते या सर्व तालुक्यांतील जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश असला तरी सध्या कालव्याची असलेली परिस्थिती पाहता किमान ६० ते ७० हजार हेक्टर क्षेत्रास याचा लाभ प्रत्यक्षात होत आहे. यंदा पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी प्रथम सोडण्यात आले होते व पाऊस कमी झाला की ओव्हरफ्लोचे पाणी बंद करण्यात आले; मात्र, त्या वेळी आवर्तन बंद न करता लगेच नियमित आवर्तन सल्लागार समितीची बैठक न होताच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोडले होते. कुकडीचे मागील आवर्तन कुकडीच्या इतिहासात बहुदा सर्वांत जास्त दिवस म्हणजे जवळपास दीड महिना चालले, असे असतानादेखील टेल टू हेड आवर्तन असतानाही श्रीगोंदे तालुक्यात काही ठिकाणी पाणी घेतल्याने कर्जत आणि करमाळा तालुक्यास कमी दाबाने पाणी मिळाले. त्यामुळे कर्जत तालुक्यातील काही चाऱ्यांना पाणी मिळाले नव्हते. यामुळे श्रीगोंदे तालुक्याचे आवर्तन झाल्यावर कर्जत तालुक्यातील राहिलेल्या दोन चाऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते.

या वेळी कर्जत तालुक्यासह सर्वत्र परतीचा पाऊस चांगला झाला. यामुळे रब्बी ज्वारी, हरबरा, गहू, कांदा, कापूस व ऊस अशा सर्व पिकांची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय फळबागादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. काहींनी यामध्ये आणखी क्षेत्र वाढवले आहे. द्राक्षाच्या बागा नव्याने तालुक्यात झाल्या आहेत. या सर्व पिकांना उगवण चांगली आहे. कर्जत तालुक्यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, कारण ज्वारीचा फायदा कडबा व ज्वारी असा दोन वेळा होतो. ज्वारीसह सर्व पिकांना उगवण चांगली आहे.

रब्बी पिकांमध्ये यंदा पाऊस व पाणी जादा असल्याने मोठ्या प्रमाणावर तण वाढले होते. हे तण काढताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले होते, कारण तण काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते. त्यामुळे जादा पैसे देऊन तण काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. आता ज्वारीसह सर्व रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. पाणी आता लगेच दिले तर या वेळी विक्रमी उत्पादन होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र, यासाठी सर्व काही जुळून येण्याची गरज आहे. पाण्याला ओढ दिल्यास पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

सध्या आठ तास शेतीला वीज पुरवण्याचा निर्णय सरकराने जाहीर केला आहे; मात्र, एकतर वीज पूर्ण दाबाने मिळत नाही किंवा सतत खंडीत होते. वीज आल्यावर दारे धरण्यास गेलेल्या शेतकऱ्यास लाइट सतत खंडीत झाले तर सारखे वीजपंप सुरू करण्यासाठी ये-जा करावी लागते. याशिवाय सामायिक विहीर असेल तर मात्र त्याचे भरणे झाले नाही तर पुन्हा त्याची भारी येई पर्यंत त्याना थांबावे लागते. यादरम्यान ओढ बसल्याने पिकांची वाढ खुंटते व नुकसान सहन करावे लागते. यामुळे कालव्याला पाणी आले तर शेतकऱ्यांचे भरणे होते व वेळेत पाणी मिळाल्याने उत्पादनदेखील वाढेल.

पाण्याचे नियोजन आवश्यक

कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी लवकर सल्लागार समितीची बैठक घेण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बैठक होणार तिथून पुढे निर्णय होणार व आवर्तन सुटल्यावर शेवटच्या शेतकऱ्यास पाणी मिळण्यास किमान एक महिना तरी लागतो, त्यामुळे आता आवर्तन सोडण्याची घाई करावी लागणार आहे. या शिवाय आवर्तन सोडताना त्याचे नियोजन करण्याची गरज आहे. आवर्तन टेल टू हेड आहे, असे सांगतात व प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. कालव्यामध्ये जमिनीत पाइप टाकून पाणी घेण्यात येते. यामुळे पुढे जास्त दाबाने पाणी जात नाही. यामुळे दिलेल्या नियोजित वेळेत करमाळा व कर्जत तालुक्यांना पाणी सर्वांना मिळत नाही व सर्व आवर्तन कोलमडून पडते. आवर्तन आता सोडले तर पुन्हा पुढे किमान दोन आवर्तन मिळतील. कुकडी लाभक्षेत्रातील धरणामध्ये त्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा आहे.

चौकट ः

सिना धरणाचे आवर्तन सोडावे

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे सिना धरण आहे. या वेळी धरणात पाणी दोन आवर्तन करता येईल एवढे आहे. सिना लाभक्षेत्रातील निमगाव ते दिघी या परिसरामध्ये कमी पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसावर रब्बी पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जातो. अनेक वर्षांनंतर उसाची लागवड करण्यात आली आहे. रब्बी पिकांना या परिसरामध्ये पाण्याची मोठी गरज आहे. यामुळे सिनाचे आवर्तन तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, तसेच कुकडीचे आवर्तन सुटल्यावर ते पाणी सिना धरणामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *