facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / ‘स्पार्क’ काळ्या यादीत

‘स्पार्क’ काळ्या यादीत

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – शौचालयांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम, दुरुस्तीतील चालढकल, नियोजित वेळेत काम पूर्ण न करणे अशाप्रकारचा ठपका ठेवून महापालिकेने ‘स्पार्क’ या स्वयंसेवी संस्थेची कंत्राटे रद्द करत पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच संस्थेला २४ लाखांचा दंडदेखील आकारला असून, २६ लाखांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.

पालिकेतर्फे झोपडपट्टी भागात शौचालये बांधण्याचे काम अनेक वर्षांपासून ‘स्पार्क’ला दिले जात होते. संस्थेच्या कामाबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी येत असल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई कोणत्या स्वरूपाची आहे, अशी विचारणा सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली पालिकेकडे केली होती. त्यावर पालिकेच्या वस्ती स्वच्छता कार्यक्रम खात्याचे उपप्रमुख अभियंता यांनी पालिकेने २६ फेब्रुवारीला ‘स्पार्क’ला पत्र पाठवून काळ्या यादीत टाकल्याचे कळविले आहे. तसेच २३ मार्चला परिपत्रक जारी करत नोंदणी क्रमांक ४१२७ आणि १४८८४ अंतर्गत दिलेली कंत्राटे रद्द करत पाच वर्षांसाठी काळया यादीत टाकल्याचे स्पष्ट केले आहे. ‘स्पार्क’ला कोणतेही नवीन काम न देता आणि दिलेल्या कामाची देयके रोखून ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

‘स्पार्क’ला २०१२मध्ये दिलेली ६६ पैकी ३७ कामे करण्यास संस्थेने नकार दिला. २९ पैकी फक्त २० कामे पूर्ण केली. तसेच आठ कामे अपूर्ण असून, एक काम अद्यापपर्यंत सुरूच झालेले नाही. ३० जून २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण न झाल्याने ३० जून २०१५ पर्यंत वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यातही ‘स्पार्क’ अपयशी ठरल्याचे पालिकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

दरम्यान, पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे एकच स्वयंसेवी संस्था किंवा कंत्राटदारांस कामे देण्याऐवजी प्रभाग स्तरावर वेगवेगळ्या संस्थांना कामे दिल्यास ती वेळेवर पूर्ण होतील आणि स्थानिक नागरिकांना लाभ होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘स्पार्क’वर ठेवलेला ठपका

> हमी कालावधीत शौचालय दुरुस्ती न करणे

> हमी कालावधीत शौचालय दुरुस्ती न करणे

> धीम्यागतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम

> अकार्यक्षम, वेळेत काम पूर्ण न करणे

> अभियांत्रिकी पद्धतीची अवहेलना

> दंडात्मक कारवाईस न जुमानणे

> अस्पष्ट आणि असंबद्ध उत्तरे

> कर्मचाऱ्यांची कमतरता, कामात विलंब

> कामात दोष आणि फसवेगिरीचे आरोप

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *