facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / उद्धव ठाकरे यांचा मोदींवर पुन्हा निशाणा
modi-thakare-news

उद्धव ठाकरे यांचा मोदींवर पुन्हा निशाणा

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची भाषा करून मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा उघड्या गाडीतून मुंबईत फिरणाऱ्या नेहरूंची मस्ती मुंबईकरांनी उतरवली होती. सगळ्याच पंतप्रधानांमध्ये अशी मस्ती असते काय, याची मला कल्पना नाही, असे वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी एका कार्यक्रमात अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला.

मुंबई महापालिकेतर्फे मुंबई मलनिःसारण प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत कुलाबा येथे उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी मुंबई मराठी माणसांनी संघर्ष करून मिळवली आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळेस नेहरू पंतप्रधान होते. नेहरूंची एक वेगळी मस्ती होती. नेहरूंच्या नजरेला नजर देण्याची ताकद कुणामध्ये नव्हती. नेहरू तेव्हा म्हणाले होते की, मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही. नेहरूंच्या या महाराष्ट्रद्वेषामुळे खवळलेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला व नेहरूंचा अहंकार वठणीवर आणला. त्यानंतर नेहरू मुंबईत येत तेव्हा त्यांना बंद गाडीतून फिरावे लागत होते. सर्वसामान्यांचा हा राग असतो, तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका. आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही, असा इशारा उद्धव यांनी मोदी यांचे नाव न घेता दिला.

मागील पाच ते दहा वर्षांपासून कुलाबा प्रकल्पासाठी शिवसेनेचा पाठपुरावा सुरू होता. ते काम पालिकेच्या टीमने करून दाखवले असल्याचे कौतुक उद्धव यांनी केले. आपल्या भाषणात उद्धव यांनी पालिकेतील घोटाळ्यांचा संदर्भ देत मध्यंतरी काही जळमटे आली होती. अभियंते, कंत्राटदार कसे भ्रष्ट आहेत हे सांगितले जात होते. मात्र हे कुलाब्याचे सफाई केंद्र सुरू झाले आणि साचलेला गाळ निघून गेला, असे उद्धव म्हणाले.

सध्या देशात हजार आणि पाचशेच्या नोटांची चणचण भासते आहे. मात्र महाराष्ट्रात दुष्काळ पडूनही मुंबईत पाण्याचा तुटवडा आपल्याला जाणवत नाही कारण मुंबई महापालिका काम करीत असते, म्हणून हे शक्य होते. विधानसभा निवडणुकीत रेसकोर्स सर्वसामान्य लोकांसाठी मोकळे करण्याचा शब्द दिला होता, याकडे लक्ष वेधत घोड्यांची शर्यत आकर्षण ठरू शकते, गरज ठरू शकत नाही. मुंबईच्या बाहेर चौपट मोठा रेसकोर्स करा. रेसकोर्सचा भूखंड सर्वसामान्य मुंबईकरांसाठी का वापरायचा नाही, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना यायचे होते

मुख्यमंत्र्यांनाही या कार्यक्रमाला यायचे होते. मात्र शक्य झाले नाही. आमचे फोनवर बोलणे झाले. मुंबईचे काम आहे. आपण भूमिपूजन करून घ्या. पुढे आणखीही चांगली कामे होणार असून मी सोबत असेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची मा‌हिती उद्धव यांनी आपल्या भाषणात दिली. या कार्यक्रमास पालिकेतील भाजपचे पदाधिकारी गैरहजर राहिले होते.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *