facebook
Sunday , December 4 2016
Home / नागपूर / नोटाबंदीने वाढविल्या पर्यटनाच्या अडचणी
currency

नोटाबंदीने वाढविल्या पर्यटनाच्या अडचणी

एकीकडे नोटाबंदीने रोजचे व्यवहार अडचणीत आले असतानाच ऐन हंगामात पर्यटन व्यवसायापुढील अडचणी वाढविल्या आहेत. पर्यटन दौऱ्यांचे बुकिंग रद्द होण्यापासून ते दौऱ्यावर जाऊनही पर्यटनस्थळे न बघता येण्यापर्यंत विविध अडचणींना पर्यटकांना आणि पर्यटन कंपन्याना सामोरे जावे लागत आहे.

पर्यटनासाठीचे बुकिंग करताना अनेक पर्यटकांना रोख रक्कम देण्याची इच्छा असते. मात्र, असा रोख व्यवहार करण्यावर आलेल्या बंधनांमुळे ‌कित्येक बुकिंग रद्द झाले आहेत. दुसरीकडे, दुसऱ्याचे प्रवास ‘स्पॉन्सर’ करुन देणारेही तयार झाले आहेत. एकीकडे रोखीमुळे प्रवास रद्द झाल्याची उदाहरणे असताना पर्यटन कंपन्यांकडे दौऱ्यांची चौकशी करणारे किंवा थेट बुकिंग करायला येणारेही वाढले आहेत. त्यामुळे, अडचणीच्या काळात काही पर्यटन संस्थांच्या झोळीत असे बुकिंग अलगद येऊन पडल्याची माहिती पर्यटन व्यावसायिकांनी दिली.
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या पर्यटकांना विदेशी चलन बदलून घेण्यासाठी अडचणी येत आहेत. चलनबदल करून देणाऱ्या संस्था पर्यटकांना चेकने पैसे देण्यास सांगत असल्याने ते पर्यटकांच्या गैरसोयीचे ठरत आहे. पर्यटकांची रोख देण्याची तयारी असते मात्र आम्हीच आता रोख स्वीकारणे बंद केले आहे. त्याचा फटका आम्हाला बसला आहे. मात्र, पर्यटन संस्थांपेक्षाही जास्त अडचणी पर्यटकांच्या झाल्या असल्याचे नागपुरातील पर्यटन व्यावसायिक स्मिता मिरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

खरेदी नाही, स्थलदर्शनही नाही

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्यावेळी जे पर्यटक प्रवासात होते त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पर्यटनस्थळी प्रवेशाचे शुल्क देण्यासाठी १०० च्या नोटा नसल्याने दूरवर जाऊनही प्रसिद्ध स्थळे न बघता पर्यटकांना परत यावे लागले आहे. याशिवाय, कोणतीही खरेदी करू न शकल्याने त्या सुमारास अनेक पर्यटनस्थळांवरील बाजार ओस पडल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले. रेल्वेसारख्या सरकारी संस्थेनेही काही काळ ५०० आणि १००० च्या नोटा न स्वीकारल्याने तिकिटे काढण्यात अडचणी आल्याचा अनुभव काही पर्यटकांनी सांगितला. मात्र, बऱ्याच ठिकाणी हॉटेल्सनी जुन्या नोटा स्वीकारण्याचा मोठेपणा दाखविल्याने पर्यटकांना त्याबाबतीत कमी अडचणी गेल्याची माहिती आहे. ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून पर्यटन व्यवसायाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते आहे. वाहनचालक, पर्यटक, कंपन्या यांच्यापासून पर्यटनाशी संबंध‌ित प्रत्येक घटकावर या नोटाबंदीचा परिणाम झाला आहे. पर्यटनाचे कमी झालेले प्रमाण आणखी काही काळ असेच राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरचा काळ आपल्याकडे पर्यटनाचा हंगाम समजला जातो. नोटाबंदीच्या निर्णयाने ऐन हंगामात या व्यवसायाला काही प्रमाणात मंदीचा फटका बसला आहे.

Check Also

news-8

प्रा. साईबाबा खटला; १ डिसेंबरला अंतिम युक्तिवाद

आवाज न्यूज नेटवर्क – नागपूर – कथित माओवादीसमर्थक असल्याचा आरोप असलेले दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *