facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / सामाजिक विषमता दाखवणारे ‘वावटळ’
drama-news

सामाजिक विषमता दाखवणारे ‘वावटळ’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – गरीब-श्रीमंत यांच्यातील भेद, सवर्ण व दलित यांच्यात सुरू असलेला संघर्ष पूर्वीपासून असून, त्यामुळे या दोहोमंधील दरी वाढतच चालली आहे. हे दाखवणारे ‘वावटळ’ हे नाटक सोमवारी सादर झाले. इतर दिवशी दोनच अंकी नाटक सादर झाले. मात्र, या नाटकाचे विशेष म्हणजे हे तीन अंकी नाटक होते.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे ५६ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत लक्ष्मण काटेलिखित ‘वावटळ’ हे नाटक सादर झाले. हे नाटक श्री शिवछत्रपती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ संस्थेतर्फे प्रस्तुत करण्यात आले होते.

विठोबा हा दारिद्र्याने गांजलेला वृद्ध गृहस्थ आहे. तो एका शेतात झोपडे बांधून राहतो. त्याला राम नावाचा मुलगा व सीता नावाची सून असते. हे दाम्पत्य म्हाताऱ्या विठोबाला खूप जीव लावते. अगदी स्वत: न जेवता त्याला जेऊ घालणे, आजारपणामध्ये त्याची काळजी करणे, त्याला जिवापाड जपण्याचे काम हे दोघे प्रामाणिकपणे करतात. अशातच सुंदर सीतावर डोळा असलेला पाटलाचा मुलगा रामला पैशांचे आमीष दाखवून काहीबाही काम करायला लावतो. घरात पोटापाण्यासाठी अन्नाचा कण नसल्याने राम त्याचे म्हणणे ऐकतो. मात्र, त्याच्या हातून बरेवाईट घडविण्याचा पाटलाच्या मुलाचा उद्देश असतो. त्यातून त्याला सीताला बळकवायचे असते. एक दिवस पाटलाचा मुलगा येतो आणि सीताला उचलून घेऊन जातो. तिच्या खूप विनवण्या करतो, त्याचे तिच्यावर प्रेम असते. ती नकार देते. त्यामुळे नैराश्यातून तो विष पिऊन आत्महत्या करतो. इकडे पाटील मुलाच्या मृत्यूमुळे खवळून उठतो व सीताला विहिरीत ढकलून देतो. त्यात तिचा मृत्यू होतो. राम पाटलाला जाब विचारायला येतो तेव्हा तो धोंड्या दरोडेखोराचे नाव पुढे करतो. राम धोंड्याला मारायला निघतो व त्याचा खात्मा करून येतो. मात्र, त्याला विहिरीत सीताचा मृतदेह दिसतो. त्यामुळे राम वेडापिसा होतो. त्याच वेळी इकडे विठोबा पुरलेले धन रामला देऊ, म्हणून ते खणतो तर त्यात सर्व दगडधोंडे निघतात. त्या धसक्याने त्याचाही मृत्यू होतो. राम वेडा होऊन निघून जातो. अशा प्र्रकारे वावटळ येऊन त्या कुटुंबाची वाताहत होते.

या नाटकात प्रसन्न काटे, अतुल महानवर, एकाग्रता सोनवणे, किरण शिंपी, चंद्रवदन दीक्षित, सुनील सूर्यवंशी, मयूर गरुड, प्रतीक साळी, सुनीता गरुड, हर्ष गरुड, प्रवीण पाटील यांनी भूमिका केल्या. संगीत प्रा. नीलेश जाधव यांचे व नेपथ्य सुनीता गरुड, प्रतीक साळी यांचे होते. प्रकाशयोजना दिनेश चौधरी यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन प्रसन्न काटे यांनी केले होते. रंगभूषा माणिक कानडे यांची होती. विशेष सहाय्य बहुरूपी कलावंत यांचे होते.

Check Also

swapnil-shinde_2051

विविध कार्यक्रमांनी महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६०व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *