facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / अहमदनगर / एकेकाळचे मित्र झाले विरोधक

एकेकाळचे मित्र झाले विरोधक

आवाज न्यूज नेटवर्क

अहमदनगर

एकेकाळचे मित्र असलेल्या, मात्र आता पालिका निवडणुकीत राजकीय विरोधक असलेल्या आपल्याच मित्रांना पराभूत करण्याची वेळ माजी आमदार राजीव राजळे, प्रताप ढाकणे व माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्यावर आली असून या मध्ये नेमके कोण यशस्वी होतो या कडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी जगदंबा विकास आघाडीकडून बंडू बोरुडे, काँग्रेसकडून बंडू ऊर्फ विठ्ठल रणजीत बोरुडे व भाजपकडून डॉ. मृत्युंजय गर्जे हे तिघे उभे असून या पैकी बंडू बोरुडे हे राजीव राजळे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक होते. राजळे हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर बोरुडे यांचे ते खास मित्र म्हणूनही परीचित होते. दूध संघाचे संचालक, नगरसेवक, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशी विविध पदे भूषविलेल्या बोरुडे यांनी मित्रधन ही संघटना स्थापन करून राजळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले होते, तर राजळे यांनी लढवलेल्या अनेक निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागही घेतला होता. राजळेंच्या वर्तुळातील खास माणूस अशी ओळख असलेल्या बोरुडे यांनी राजळेंशी राजकीय मतभेद झाल्यानंतर त्यांची साथ सोडून माजी आमदार चंद्रशेखर घुलेंशी जुळवून घेतले. सध्या आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी राजळे यांनी आता आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

दुसरीकडे भाजपने नगराध्यक्षपदासाठी उभे केलेले डॉ. मृत्युंजय गर्जे हे प्रताप ढाकणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व खास मित्र होते. ढाकणे यांच्या प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी सुद्धा त्यांनी या पूर्वी पार पाडली आहे. ढाकणे यांचे समवेत गर्जे यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी, स्व. गोपीनाथ मुंडे व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीही घेतल्या होत्या. ढाकणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊ नये या साठी गर्जे हे शेवटपर्यंत आग्रही होते. काळाच्या ओघात याच मुद्यावरून ढाकणे व गर्जे यांचे राजकीय मतभेद होत ढाकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तर गर्जे हे भाजपमध्येच राहीले. सध्या भाजपचे उमेदवार असलेल्या गर्जे यांना पराभूत करण्यासाठी ढाकणे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

जी वेळ राजळे व ढाकणे यांच्यावर आली तीच वेळ सध्या माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्यावर आली असून काँग्रेसकडून उभे राहिलेले बंडू ऊर्फ विठ्ठल रणजीत बोरुडे हे आव्हाड यांचे खास समर्थक व घनिष्ट मित्र म्हणून ओळखले जात होते. कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या बोरुडे यांनी मागील पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिली. बोरुडे हे सुद्धा मोठ्या मताधिक्याने त्या वेळी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना आव्हाड यांनी उपनगराध्यक्षपद व बांधकाम कमिटीचे अध्यक्षपद मिळवून दिले. आव्हाड हे नगराध्यक्ष असताना पालिकेसंदर्भात कोणताही निर्णय असला तरीही आव्हाड हे बोरुडेंशी चर्चा केल्यानंतरच निर्णयावर शिक्कामोर्तब करायचे. सध्या बोरुडे यांनी आव्हाड यांची साथ सोडत काँग्रेसकडून निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली असून आता आव्हाड यांना बोरुडेंच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ आली आहे. एकेकाळचे मित्र तर आता राजकीय विरोधक असलेल्या आपल्याच मित्रांना निवडणुकीच्या रिंगणात चितपट करण्याची वेळ राजळे, ढाकणे व आव्हाड यांच्यावर आली असून या मध्ये नेमके कोण जिंकते व कोण हरते या कडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *