facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / नगरोत्थानमधील रस्त्यांची चाळण

नगरोत्थानमधील रस्त्यांची चाळण

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – शहरांतर्गत रस्ते तयार करण्यासाठी महापालिकेला केंद्र, राज्य व नगरोत्थान योजनेतून निधी मिळाला. यातून महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभागावतीने केलेल्या रस्त्यांची जुलैमधील पावसाळ्यात पुरती दैना उडाली. १५ ऑक्टोबरपासून रस्ते दुरुस्तीला सुरुवात होणार होती. मात्र एक महिना होऊनही दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आता प्रशासनाने, अभियंत्याची बैठक घेवून आठवड्यात काम सुरू करू, असे सांगितले आहे. मात्र, यापूर्वीच बैठक घेऊन काम सुरू का केले नाही, असा प्रश्न आहे. कामांना उशीर करून प्रशासनाला कोणाला लाभ द्यायचा आहे अशी विचारणा होत आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील प्रमुख ५९ रस्त्यांची कामे नगरोत्थान योजनेंतर्गत निधीतून झाली. सरासरी १० ते ४८ लाख रुपयांचे टेंडर असलेल्या कामांवर एकूण १४ कोटी रुपये खर्च झाले. सार्वजनिक बांधकाम विभागानेही २५ हजार मीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण केले. महापालिकेने न्यू महाद्वार रोड, विवेकानंद कॉलेज, त्रिवेणी हॉटेल, मंगळवार पेठेतील रस्ते केले. कामांना एक ते तीन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली होती. मात्र जुलैत झालेल्या पावसामध्ये सर्वच रस्त्यांची दैना उडाली. लगेच रस्ते खराब झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. लोकभावना लक्षात घेवून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी ठेकेदारांकडून तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर खराब रस्त्याला जबाबदार आठ ठेकेदारांना जबाबदारी निश्चितीची नोटीस लागू केली होती. ठेकेदारांनी १५ ऑक्टोबरनंतर लगेच रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिले होते.

मात्र, आता एक महिना उलटूनही रस्ते दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. प्रशासन झोपल्याच्या स्थितीत आहे. रस्ते दुरुस्तीला उशीर होत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांचा दबाव वाढला. आता. शहर अभियंत्यांनी नुकतीच बैठक घेऊन आराखडा तयार करुन घेतला आहे. मात्र, मुदतीनंतर गेल्या महिनाभरात दुरुस्ती का सुरू झाली नाही हा प्रश्न शिल्लक राहतो.

सार्वजनिक बांधकामकडे

१५ रस्त्यांची दुरुस्ती

सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरात २५ हजार मीटर लांबीचे १३९ रस्त्यांचे डांबरीकरण केले. राज्य सरकारने यासाठी २० कोटी रुपये दिले. मात्र जुलै महिन्यातील पावसात हे रस्तेही उखडले. त्यामुळे विभागाने १५ ठेकेदारांना नोटीस बजावली होती. अभियंत्यांनी सर्वेक्षण करुन १५ रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल दिला होता. मात्र या रस्ते दुरुस्तीलाही सुरुवात झालेली नाही.

===

पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चारही विभागांच्या अभियंत्यांची शुक्रवारी बैठक घेतली. रस्ते दुरुस्तीचा आराखडा तयार केला आहे. पुढील आठवड्यात या कामाना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *