facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Uncategorized / राष्ट्रवादीला जबर फटका

राष्ट्रवादीला जबर फटका

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झाले असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर फटका बसला आहे. राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी अवघी एकच पुणे येथील जागा राष्ट्रवादीला राखता आली असून काँग्रेसशी आघाडी न करण्याचा अजित पवार व प्रफुल पटेल यांच्या हट्टाची राष्ट्रवादीला पुरेपूर किंमत चुकवावी लागली आहे. यवतमाळ येथे काँग्रेसचा उमेदवार विजयी होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने स्वतःच्या संदीप बजोरीया यांना ऐनवेळी अनधिकृतरित्या रिंगणातून माघार घ्यायला लावून तिथे शिवसेनेला मदत केल्याचे चित्रही स्पष्ट झाले.

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुमताला या निमित्ताने सुरुंग लागला आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील दोन नेते धनंजय मुंडे व सभापती रामराजे निंबाळकर या दोघांचेही सदस्यत्व संपल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच उभा राहिला होता. तेव्हा खुद्द शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी बोलणी करून या दोन्ही जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या होत्या व स्थानिक काँग्रेस नेत्यांना हात चोळत बसावे लागले होते.

पुणे, सातारा-सांगली, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, नांदेड व जळगाव या सहापैकी सातारा-सांगली, नांदेड व गोंदिया या तीन जागा काँग्रेसला सोडाव्यात व पुणे, यवतमाळ व जळगाव या जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, असा काँग्रेसचा प्रस्ताव होता. मात्र सातारा-सांगलीची जागा सोडण्यास अजित पवार बिलकूलच तयार नव्हते. तर गोंदियाची जागा गोपालदास अगरवाल यांच्याशी असलेल्या कट्टर वैरामुळे आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा प्रफुल पटेल यांचा हट्ट होता. त्यामुळे काँग्रेसबरोबरची आघाडी फिसकटली. त्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसच्या नांदेड येथील जागेवर शामसुंदर शिंदे या अपक्ष उमेदवाराला पूर्ण रसद पुरवण्याचे काम केले होते. मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हा गड राखत त्यांचे कट्ट्रर समर्थक अमर राजूरकर यांना विजयी केले. तसेच ज्या सातारा सांगलीसाठी अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती तिथे राष्ट्रवादीने जानकर यांच्या पक्षातून आणलेल्या शेखर गोरे यांना काँग्रेसच्या तिकीटावर उभ्या असलेल्या माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे.

जळगाव येथील जागेवर राष्ट्रवादीने भाजपबरोबर अंडरस्टँडिंग करून माघार घेत भाजपच्या चंदू पटेल यांचा विजय सुकर केला. त्याच्या बदल्यात खरेतर भाजपच्या सातारा-सांगली येथील उमेदवाराने माघार घेतली होती. मात्र त्याचा कोणताही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. जळगाव येथे भाजपला दगाफटका होण्याची शक्यता एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याच्या पार्श्वभूमीवर रंगली होती. मात्र गिरीश महाजन यांचे समर्थक पटेल यांच्या विजयाने भाजपच्या नेत्यांमधील धुसफूस निवडणुकीत दिसत नाही, हे स्पष्ट झाले. पुण्यात शिवसेनेच्या उमेदवाराने घेतलेल्या माघारीच्या बदल्यात अजित पवार यांचे कट्ट्रर समर्थक संदीप बजोरीया यांनी यवतमाळमध्ये उमेदवारी अर्ज भरूनही माघार घेतल्याने शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचा विजय सुकर झाला. तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले शिवसेनेच्या माघारीमुळे विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या खात्यात एकमेव जागा तरी पडली.

गोंदियामध्ये प्रफुल पटेल यांचे समर्थक रविंद्र जैन आणि काँग्रेस आमदार गोपालदास अगरवाल यांचे पूत्र प्रफुल्ल अगरवाल यांच्यातील मतविभाजानाचा फायदा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक भाजप उमेदवार प्रणय फुके सहज जिंकून आले.

पुणे – अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)

⚡यवतमाळ – तानाजी सावंत (शिवसेना)

⚡नांदेड- अमर राजूरकर (काँग्रेस)

⚡भंडारा-गोंदिया- परिणय फुके (भाजप)

⚡सांगली-सातारा- मोहनराव कदम (काँग्रेस)

⚡जळगाव- चंदूलाल पटेल (भाजप)

Check Also

सॅमसंग नोट ७ चा पेट घेतलेला Video झाला Viral

सदोष बॅटरीमुळे या कंपनीने नोट ७ चे उत्पादनही थांबवले आहे त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी नोट ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *