facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / ‘वायफाय, होर्डिंग कशाला; कामं करा’

‘वायफाय, होर्डिंग कशाला; कामं करा’

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – तरुणांना खूश करण्यासाठी काही नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात ठरावीक चौकांमध्ये वायफायची सुविधा दिली आहे… त्यामुळे आम्हाला खूश करण्यापेक्षा, तरुणांना होर्डिंगवर झळकण्याची चटक लावण्यापेक्षा तुम्ही वॉर्डात कामे करा, त्यात युवकांना सामावून घ्या, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाका अशी मागणी युवा मतदारांनी अर्थातच शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना जबाबदार युवक म्हणून त्यांच्या अपेक्षाही त्यांनी मांडल्या आहेत. नगरसेवकांनी सुरू केलेल्या वायफायचा स्थानिक युवकांपेक्षा बाहेरून शिकायला आलेलेच जास्त वापर करतात, वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्ये कुणालाही रस नाही. प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमध्ये होणाऱ्या कामांचा तपशील नागरिकांना द्यावा. महापालिकेने प्रत्येक नगरसेवकाला दिला जाणारा निधी आणि तो कोणत्या कामांसाठी दिला जातो याचा तपशील नागरिकांसमोर जाहीर करावा, न होणाऱ्या कामांसाठी नगरसेवकांना जबाबदार धरले जावे, ही जबाबदारी झटकण्याच्या पळवाटाच त्यांना देऊ नयेत, अशी अपेक्षा या युवा मतदारांनी व्यक्त केली आहे. स्मार्टसिटीच्या स्पर्धेत पुण्याला पुढे नेण्यासाठी मेट्रोसारख्या सुविधा लवकरात लवकर द्यायल्या हव्यात आणि शहराचा विकास आराखडा नागरिकांच्या सहभागाने तयार करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महापालिकेने चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध केल्यास तरुण आवडीने त्याचा वापर करतील. वर्षानुवर्षे पीएमपीएमएल बदलण्याची केवळ चर्चाच होते. लोकप्रतिनिधींनी कधीच हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही. पुणेकरांची घोर निराशा केली आहे. बॅटरी ऑपरेटेड रिक्षाही शहरात सुरु करायला हव्यात. महापालिकेने नियमित जॉब फेअर आणि कौन्सेलिंग सेंटर प्रभागात सुरू करावीत. वेस्ट डिस्पोजलसाठी वेगळी व्यवस्था करणे अपेक्षित आहे.
यश देशपांडे, एनबीएन, सिंहगड स्कूल ऑफ इंजिनीअरिंग

शहरात चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची गरज आहे. ती नसल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे रोग पुण्यात त्यामुळेच अधिक वेगाने पसरतात. कचऱ्याचे नियोजन नाही. सोमेश्वरवाडी परिसरात बसच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे. येथील पुलाचे काम गेली अडीच वर्षे सुरू आहे मात्र, ते पूर्णत्वास गेलेले नाही. महापालिकेने असे रखडलेले प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत.
मंदार दीक्षित, मॉडर्न कॉलेज

स्मार्टसिटी हा चेष्टेचा विषय ठरतो आहे. त्यामागची कारणे जाणून घेऊन नगरसेवक आणि महानगरपालिकेने पुढचा अजेंडा ठेवणे गरजेचे आहे. नागरिक म्हणूनही आपण निगरगट्ट झालो आहोत, नगरसेवक किंवा ज्या महानगरपालिकेला कर देतो, त्या व्यवस्थेला आपण कोणतेही प्रश्न कधीच विचारत नाही. त्यामुळे पुण्याची आजची अवस्था बिकट आहे. रबरी स्पीड ब्रेकरसारखा घाणेरडा प्रकार बंद करायला हवा. नागरिकांसाठी कसे काम करायचे याचे धडे नगरसेवकांना महानगरपालिकेने द्यायला हवेत. त्यांना परदेशी सहलींना पाठवणे बंद करावे. सिंहगड रोडवर बीआरटीचा अट्टहास करून नागरिकांना आणखी वेठीला धरू नका.
शाल्मली धर्माधिकारी, साक्षी जोशी, गरवारे कॉलेज

सार्वजनिक ठिकाणच्या कचरापेट्या उचलण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचे काही वेळापत्रकच नसल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात कचऱ्याचे थैमान वाढले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांची माहिती नागरिकांपर्यंत जायला हवी. ते नेमके कुठे आहेत, हेच अनेकांना माहिती नसते. औषध फवारणी नियमित व्हायला हवी. ती के‍वळ तक्रार केल्यावरच होते. सणांच्या दिवसात आणि विकेंडला लक्ष्मी रोडसारखे रस्ते फक्त वॉकिंग प्लाझा म्हणूनच जाहीर करावेत.
गंधाली देशपांडे, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसेस

अप्पर-इंदिरानगर, सुखसागरनगर, कोंढवा या परिसरात सुविधांची वानवा आहे. कॉलेजकडे जाणारा रस्ताही पावसाळ्यात अतिशय भीषण असतो. या भागात त्यामुळे अपघताही होतात. सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. नगरसेवकांच्या माध्यमातून त्या नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात.
ओंकार कुलकर्णी, व्हीआयआयटी कॉलेज

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *