facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / भाजप मुस्लिम-मराठा आरक्षणविरोधी
2325237923462352232723662357-234423272352234623662354236723252366-2344235723662348-2350235423672325

भाजप मुस्लिम-मराठा आरक्षणविरोधी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत मराठा व मुस्लिम समाज आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, तो त्यांचा न्याय्य हक्क आहे. पण भाजपवाले आरक्षण मिळू देणार नाहीत, ते आरक्षणाच्या विरोधी आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.

कोपरगाव पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मलिक बोलत होते. युवा नेते आशुतोष काळे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयराव आढाव, प्रदेश सचिव संदीप वर्पे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, शहराध्यक्ष सुनील गंगुले आदी या वेळी उपस्थित होते.

कोपरगाव पालिका निवडणुकीत कर्मवीर शंकरराव काळे साखर उद्योग समूहाचे प्रमुख आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार ताकद लावली आहे. नगराध्यक्षपदासाठी विजय आढाव यांना उभे केले असून सर्व २८ जागांवर तरुण चेहरे उभे केले आहेत. कोपरगावात मुस्लिम समाजाची मोठी मते आहेत या मोहल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रचार सभा झाली. मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुस्लिम व मराठा समाज रक्षण मागतो आहे, पण भाजपवाले आरक्षणविरोधी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मग आपल्या न्याय्य हक्काच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या भाजपला मुस्लिम व मराठा समाजाने मतदान करू नये. त्यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात मी गृहनिर्माणमंत्री असताना कोपरगाव शहरातील झोपडपट्टी तोडण्यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे आग्रही होते. या कामासाठी मला ते सतत भेटत असत, पण मी त्यांना ठणकावून सांगितले, झोपडपट्टीधारकांचे आधी पुनर्वसन करा, मगच त्याच्या झोपड्या तोडा. मी कोल्हे यांचे ऐकले असते तर कोपरगावच्या झोपडीत राहणाऱ्या गरिबांची घरे उद्ध्वस्त झाली असती.

मलिक म्हणाले, ७६ व्या घटना दुरुस्तीनंतर अस्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वांत जास्त अधिकार दिले आहेत. जीएसटी करप्रणाली या देशात सुरू होणार आहे. त्यामुळे जमा होणाऱ्या करामधून केंद्राचा वाटा केंद्राला, राज्याचा वाटा राज्याला व स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा लोकसंख्येच्या आधारावर आपोआप दिला जाणार असून हा निधी अडविण्याचा अधिकार मुख्यमंत्रीच काय या देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा नाही. मुख्यमंत्र्याच्या विधानाचा समाचार घेताना नवाब मलिक म्हणाले, देशात व राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यासाठी भाजपच्या ताब्यात सत्ता द्या, जास्तीचा निधी देतो हे मुख्यमंत्र्यांचे सांगणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे. या कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी शरद पवार यांच्याकडून ४२ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली हे कोपरगावकरांना चांगले ठाऊक आहे. आशुतोष काळेही या शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील आहेत. कोपरगावच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या पिण्याच्या पाणी प्रश्नाला हात घातला. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना १५ किलोमीटर दूर जावे लागते. २-३ आठवडे नळांना पाणी येत नाही. तरीही सत्ताधारी भाजप सेना तुमच्याकडे मते मागत आहेत. अशांना तुम्ही मते देणार का, असा सवाल काळे यांनी केला.

चौकट ः

आमची तुरुंगात जायची तयारी

केंद्र सरकारने घेतलेल्या नोट बदलाच्य धोरणावर मलिक यांनी टीका केली. नोटाबंदीच्या विरोधात बोलणाऱ्यांना सरकार देशद्रोही ठरवीत आहे. कधी चार हजार घ्या, कधी दोन हजार घ्या. आज दवाखान्यात पैसे नसल्यामुळे उपचारवाचून नागरिक, लहान बालक आपला जीव गमावीत आहेत. आम्ही या जनतेसाठी आवाज उठवीत असून आम्हाला जर हे सरकार देशद्रोही ठरवणार असेल तर आमची तुरुंगात जाण्याची तयारी आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *