facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / महापालिकेवर पडणार २२०० कोटींचा बोजा

महापालिकेवर पडणार २२०० कोटींचा बोजा

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या योजनेला निधी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने नकार दिल्याने आवश्यक २२०० कोटी रुपयांचा खर्च पालिकेला उचलावा लागणार आहे. हा खर्च करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करावा, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळेस हा विषय आणून मान्यता मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे.
शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाने २४ बाय ७ ही योजना तयार केली आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार योजनेसाठी आग्रही असून काँग्रेस, मनसे, शिवसेनेचा विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपने मतदानाच्या जोरावर हा प्रस्ताव मान्य करून घेतला. या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी पुणेकरांवर वाढीव पाणीपट्टीचा भार पडणार आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आल्यानंतर पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. यामध्ये राज्य सरकारने काही त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटीची पुर्तता देखील पालिकेने केली होती. मात्र त्यानंतरही यासाठी आर्थिक मदत करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे ही योजना धोक्यात आली आहे.

योजनेला राज्य आणि केंद्र सरकारची मान्यता मिळेल, या भरवश्यावर पालिकेने यापूर्वीच २४५ कोटी रुपयांचे टेंडर मान्य करून काम सुरू केले. पाइपलाइन टाकणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, ही कामे केली जाणार आहेत. मात्र या योजनेसाठी केंद्र तसेच राज्य सरकारने निधी देण्यास नकार दिल्याने पालिकेला २२०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागणार आहे. यासाठी पालिका कर्ज रोखे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हा निधी उभा करण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीपी), कर्जाच्या माध्यमाचा विचार होऊ शकतो. कर्ज घेऊन हा प्रकल्प उभारल्यास भविष्यकाळात कर्जाची परतफेड करण्यासाठी पुणेकरांच्या पाणीपट्टीत अधिक वाढ करुन प्रशासनाला हे पैसे वसूल करावे लागणार आहे.

‘स्थायी’च्या निर्णयाकडे लक्ष

पुणेकरांच्या डोक्यावर पाणीपट्टी तसेच इतर करात वाढ करण्याची टांगती तलवार ठेवून कर्ज उभारण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवल्यास त्यावर समिती नक्की कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गुरुवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीत हा विषय मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *