facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / मी कारभारीण : छंदातून उभारला व्यवसाय

मी कारभारीण : छंदातून उभारला व्यवसाय

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – देवानगरीत राहणाऱ्या वैशाली अनिल भराडकर मुळाच्या बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथील रहिवासी. माहेरचे नाव वैशाली नारायण कुलकर्णी. घरात आई, वडिलांसह वैशाली व त्याचा एक भाऊ असा परिवार. आई गृहिणी, तर वडील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीस होते. त्यामुळे स्वाभिकपणे घरात कडक शिस्तीचे वातावरण होते. सकाळी लवकर उठणे, देवपूजा, अभ्यास यांसह सर्व कामे वेळेवर करणे त्यासाठी नियोजन करणे अशी शिस्त त्यांना लहानपणापासून लागली. स्वावलंबनाचे धडे आणि व्यवहार ज्ञानही त्यांना वडीलधाऱ्यांकडून मिळत गेले. अभ्यासात हुशार असलेल्या वैशाली यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. ती आजही कायम आहे.
१९९२मध्ये बीए अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर वैशाली यांचा विवाह औरंगाबादेतील अनिल भराडकर यांच्याशी झाला. छोट्या गावात राहणाऱ्या वैशाली मोठ्या शहरात आल्या. सासरी त्यांना माहेरप्रमाणेच पूर्णपणे निर्णय स्वातंत्र मिळाले. उच्च शिक्षण घेतल्यामुळे त्याकाळी त्यांना सहजपणे चांगली नोकरी मिळणे अवघड नव्हते, पण नोकरीपेक्षा व्यवसाय करावा, असे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मुलांचे संगोपन, घरातील अन्य जबाबदाऱ्याही त्यांच्यावर होत्या. त्याला प्राधान्यने देणे क्रमप्राप्त होते. अर्थात उद्योग, व्यवसाय क्षेत्रात जाण्याचा त्यांचा निर्धार कायम होता.
२०११-१२मध्ये त्या देवानगरी परिसरात राहण्यास आल्या. शेजारी राहणाऱ्या शैला कुलकर्णी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री जमली. कुलकर्णी यांना मोत्याचे विविध दागिने, वस्तू तयार करण्याचा छंद होता, पण त्या व्यवसाय म्हणून करत नव्हत्या. रोजच्या या भेटीगाठीतून वैशाली यांनी कुलकर्णी यांच्याकडून मोत्याचे विविध दागिने, वस्तू निर्मितीचे शिक्षण घेतले. काही दिवसांत त्या नैपुण्यही प्राप्त केले. अात्मसात केलेल्या या कौशल्याच्या जोरावरच गृहोद्योग करायला काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला. पतीसह घराच्या सदस्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि अदीक्षा क्रिएशन नावाने त्यांनी गृहोद्योगास सुरुवात केली.
अॅक्रलिक रांगोळी, मोत्यांचे तोरण, दिवे यांसह मोत्यांच्या विविध वस्तूची निर्मिती त्या करू लागल्या. सुरुवातील शेजाऱ्यासह परिसरातील मैत्रिणी, नातेवाईकांना काही गिफ्ट स्वरूप त्यांनी या वस्तू दिल्या. अवघ्या काही दिवसांतच या वस्तूना ओळखीच्या लोकांसह परिसरातील महिलांकडून चांगली मागणी येऊ लागली. विविध प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. अनेक ग्राहकांनी वैशाली यांनी तयार केलेल्या वस्तूंना पसंती दिली. काही दुकानांतही त्यांनी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने दुकानदारांकडूनही मागणी वाढली. व्यवसाय वाढत होता असतानाच यात काहीतरी नवीन करावे, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.

वैशाली यांचे नातेवाईक हैदराबादेत राहतात. त्यामुळे त्या नेहमी तेथे जात. साड्याची आवड असल्याने वैशाली हैदराबादेतून खरेदी करत. एवढ्या चांगल्या दर्जेदार कॉटन, सिल्क, हॅण्डलूम अशा विविध प्रकारच्या साड्या औरंगाबादेत फारशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, हे व्यवसायदृष्टी असलेल्या वैशाली यांनी हेरले आणि मोत्यांच्या वस्तू विक्रीबरोबरच साडी विक्री क्षेत्रातही जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा घरगुती व्यवसाय असला तरी यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक होते. स्वतःवर पूर्ण विश्वास असलेल्या वैशाली यांनी धाडस करत सुरुवातील पन्नास हजारांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली. हैदराबाद येथून होलसेल दरांत त्यांनी साड्या आणल्या. मोत्यांच्या विविध वस्तू खरेदीसाठी अनेक महिला, ग्राहक त्यांच्याकडे येतच होते. त्यामुळे साडी विक्री व्यवसायाची जाहीरात करण्याची वेळ वैशाली यांच्यावर आली नाही. विविध प्रकारच्या डिझायनर साड्या त्यांच्याकडे वाजवी किंमतीत मिळतात, अशी माउथ पब्लिसिटी परिसरात झाली आणि हा व्यवसायहीत त्यांना यश मिळत गेले.
मुलांचे शिक्षण, संगोपन, घरातील सर्व जबाबदारी यांची सांगड घालत त्यांनी व्यवसाय नेटाने पुढे नेला. व्यवसायानिमित्त अनेक महिला, कॉलेज तरुणी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री झाली. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. मोत्यांच्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारे सामान, साड्याची खरेदी करणे, त्यांचे मार्केटिंग, हिशेब ठेवणे ही सर्व कामे त्या स्वतः करतात. पती व मुलांसह सासरच्या सर्व लोकांनी केलेल्या मदतीमुळेच यश मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले.
पारदर्शकता, कामातील प्रामाणिकपणा आणि मार्केटिंग कौशल्य या जोरावर त्यांनी या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला असून, साडी व मोत्यांच्या वस्तू विक्रीसाठी स्वतःचे एक दालन असावे. त्यातून अन्य काही महिलांना रोजगारांच्या संधी निर्माण करून देता याव्यात, असे त्यांनी स्वप्न बाळगले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *