facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / Featured / मुख्यमंत्र्यांकडे १२५ कोटींचा प्रस्ताव

मुख्यमंत्र्यांकडे १२५ कोटींचा प्रस्ताव

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत, केएमटीचे बळकटीकरण आणि थेट पाइपलाइन योजनेतील दहा टक्क्याची वाढीव रक्कम मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तब्बल १२५ कोटींच्या निधीची मागणी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने केली. आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. पाइपलाइन योजनेसह शहर विकासाच्या विविध प्रकल्पांसदर्भात चर्चा केली. महापालिकेच्या विकास कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. महापालिकेच्या विकास प्रकल्पासंदर्भात २९ किंवा ३० नोव्हेंबरला मुंबईत बैठक घेण्यात येईल. यासंदर्भात आमदार अमल महाडिक यांच्यामार्फत कळविण्यात येईल, असे फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

आमदार महाडिक यांनी पाइपलाइनसह शहर विकासासाठी आवश्यक प्रकल्पांची माहिती दिली.महापालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत अपुरी पडत असून नवीन इमारतीचा आराखडा तयारआहे. नव्या इमारती उभारणीचा जवळपास ६५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे नव्या इमारतीसाठी ६५ कोटी उपलब्ध करावेत. नव्या इमारतीत सर्व कार्यालय एका छताखाली असणार आहेत. नागरिकांची सोय होणार आहे. राज्य सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केल्याचे भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

पाइपलवाइन योजनेसाठी केंद्राने महापालिकेवर वीस टक्के निधीची जबाबदारी निश्चित केली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महापालिकेच्या वाट्याची रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केली. केंद्र सरकारच्या योजनेतून केएमटीसाठी १०४ बसेस उपलब्ध झाल्या होत्या. मात्र ७५ बसेस मिळाल्या आहेत. उर्वरित २९ बसेसची खरेदी, केएमटी वर्कशॉप अद्ययावत व बस थांबे विकसित करणे आणि प्रवाशांना जलद व आरामदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विविध योजना राबवायच्या असून १५ कोटींचे अर्थसहाय करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.

शिष्टमंडळात नगरसेवक राजसिंह शेळके, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, अजित ठाणेकर, उदय इंगळे, राजू पागर आदींचा समावेश होता.

……………

पाइपलाइन योजनेकडे वेधले लक्ष

शहराच्या जिव्हाळ्याच्या थेट पाइपलाइन योजनेचे काम सक्षम आणि जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदार आणि कन्सल्टंट कंपनीचे काम समाधानकारक नाही. पाइपलाइन योजनेचे काम सक्षमपणे झाले पाहिजे. मात्र पाइपलाइन कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरत असल्याच्या तक्रारी असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. ठेकेदार आणि कन्सल्टंट कंपनीवर जलदगतीने व दर्जेदार काम करण्याची जबाबदारी निश्चित करावी अशा भावना नगरसेवकांनी मांडल्या.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *