facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / मुख्यमंत्र्यांना प. महाराष्ट्राचे वाव

मुख्यमंत्र्यांना प. महाराष्ट्राचे वाव

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर असलेल्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला लागलेली घरघर रोखण्यासाठी जात-पात-धर्म-भेद विसरुन हा उद्योग जिवंत ठेवण्यासाठी फसव्या वल्गना करणाऱ्या भाजपला त्यांची जागा दाखवून द्या,’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच विदर्भाचा पुरस्कार करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पश्चिम महाराष्ट्राचे वावडे असल्याने त्यांची आश्वासने कधीच पूर्ण होणार नाहीत, असा टोलाही लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षि शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवि रजपुते यांच्यासह नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करुन ५० दिवस थांबा पुढील ५० वर्षे चांगली असतील असे सांगत वयाची ५० वर्षे वाढवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देत असल्याची खिल्ली उडवत राणे म्हणाले, ‘अशा नोटा रद्द करुन आर्थिक स्वातंत्र्य कसे बरे मिळते. पैशाला आम्ही लक्ष्मी मानून त्याची पूजा करतो. पण पंतप्रधान मोदी त्याला ‘कागज का तुकडा’ म्हणून हिणवतात. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांची परवड होऊन ५५ जणांना जीव गमवावा लागला. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून उमेदवारीचा अर्ज भरणे सोपे पण बँकेतून पैसे काढणे कठीण बनले आहे. घोषणांचा पाऊस पाडत आहेत. दोन वर्षात राज्यात एकही संगणक न विकलेल्या मुख्यमंत्र्यांकडून डिजिटलची संकल्पना मांडणे हास्यास्पद वाटते. मोठमोठ्या घोषणा करणारा हा मुख्यमंत्री महागाई संदर्भात का बोलत नाही. भाजप आणि शिवसेनेने केवळ जनतेला फसवण्याचे एकमेव काम केले असून ते राज्याला वेगाने अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मोदींच्या निर्णयानंतर देशातील रिअल इस्टेट पूर्णत: कोलमडली असून वस्त्रोद्योग, इंजिनिअरींगसह इतर क्षेत्रात केलेली सात लक्ष कोटी गुंतवणूक करणारे हवालदिल झाले आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातच १४ भ्रष्ट मंत्री असल्याने त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.’ दुसऱ्यांना नावे ठेवणाऱ्या भाजपने सर्वाधिक गुंडांना राजाश्रय दिल्याचा आरोप राणे यांनी केला.

राणे पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळात वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी दिली गेली. पण मागील दोन वर्षात भाजपने वस्त्रोद्योगाला काय दिले. काँग्रेस आघाडीच्या काळातील योजनांचे बारसे करुन नावे बदलली. ते वस्त्रोद्योगाला मदत करु शकणार नसले तरी आम्ही स्वस्थ बसणार नाही. वस्त्रोद्योगाबरोबर कामगारांनाही ऊर्जितावस्था देऊ. त्यासाठी फसवेगिरी करणाऱ्यांना मते न देता नगरपालिकेची सत्ता सूत्रे काँग्रेस-आघाडीच्या हाती सोपावावीत.’

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, हे शहर कष्टकऱ्यांचे व कामगारांचे असून त्यांच्यावर वस्त्रोद्योगाची चाके फिरतात. पण सद्यस्थितीला ४० टक्के व्यवसाय संपला असून उर्वरीत व्यवसायाला घरघर लागली आहे. कामगारांवर उपसमाराची वेळ आली असताना मुख्यमंत्री आणि आमदार केवळ वल्गना करीत आहेत. अंगावर आले की ते झटकण्यात आमदार हाळवणकर हे माहीर आहेत. पाणी योजनांमध्ये घोळ घातला, फंडींग पॅटर्न बदलून पालिकेवर आर्थिक बोजा लादला. आम्ही आणलेल्या योजना आपल्या नावावर खपवत त्यामध्येही खोडा घालत आहेत. मात्र सूज्ञ जनतेने त्यांचे मनसुबे ओळखले असून त्यांना आता थारा मिळणार नाही. नगराध्यक्षांना फितुर करुन सत्तासूत्रे हाती घेत विकासकामे रोखत आळ आमच्यावर घातला जात आहे. पण आता त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली असून नगराध्यक्षपदासह काँग्रेस आघाडीला बहुमत द्या, शहराला २४ तास पाणी देतो. वस्त्रोद्योगाला तारुन पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देतो.’ स्वागत कामगार नेते शामराव कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक शशांक बावचकर यांनी केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आभार मानले.

व्यासपीठावर आमदार सतेज पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे, शाहू आघाडीचे प्रमुख मदन कारंडे, जनसेवा पार्टीचे अजय जावळे, प्रकाशराव सातपुते, सुरेश कुऱ्हाडे, सतिश डाळ्या, अशोकराव आरगे, अशोकराव सौंदत्तीकर, शेखर शहा, स्वप्निल आवाडे आदींसह काँग्रेस-राष्ट्रवादी-राजर्षि शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

डायबिटीस झाली पण सवलत नाही

यंत्रमागासाठी वीज बिलात सवलत मिळाल्याबद्दल आमदार सुरेश हाळवणकर यांनी अनेकदा साखर वाटली. साखर खाऊन खाऊन डायबिटीस झाला, पण वीज बिलात सवलत काही मिळाली नाही, असा सूर यंत्रमागधारकांतून ऐकावयास मिळत असल्याचा टोला राणे यांनी लगावताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

.. तर आमदार स्टेजवर कसे ?

मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या व्हाईट कॉलर गुंडांना स्टेजवर येण्यास सक्तमनाई करण्यात आली होती. हा धागा पकडत राणे म्हणाले, ‘वीज चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा झालेले पण अपिलात असलेले आमदार हाळवणकर यांना वेगळा न्याय का ? त्यांना व्यासपीठावरुन खाली का उतरविले नाही, असा प्रश्न केला.

नावाप्रमाणे शिवसेना उद्ध्वस्त केली

राणे म्हणाले,‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमानाने शिवसेना वाढवली व अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत ठेवली. पण त्यांच्यानंतर उध्दवनी ती आपल्या नावाप्रमाणे उद्ध्वस्त केली.’ तर ‘ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळवून नगरपरिषदेतील भ्रष्टाचार रोखण्याची भाषा करणारे हाळवणकर यांनी भ्रष्टाचारावर भाष्य करणे हास्यास्पद आहे. १३ टक्के कमिशन घेऊन कामे देणाऱ्याच्या तोंडी भ्रष्टाचार विरोधाची भाषा शोभून दिसत नाही, अशी खिल्ली राणे यांनी उडविली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *