facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / शिवसेनेचा पुन्हा मोदींना टोला

शिवसेनेचा पुन्हा मोदींना टोला

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – पंतप्रधानांनी एका रात्रीत नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून स्वदेशातील १२५ कोटी जनतेला रस्त्यावर आणून रांगेत उभे केले. तसे एका रात्रीत कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानी सापाचा फणा ठेचायला हवा, असा टोला हाणत शिवसेनेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

बँका आणि एटीएमच्या रांगेत उभी राहिलेली जनता देशभक्तच आहे. तथापि रांगेतल्या देशभक्त जनतेच्या हाती अद्याप दोन हजारांच्या पुरेशा नोटा पडल्या नाहीत, मात्र पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हातात आपल्या दोन हजारांच्या नोटांची पुडकी सापडावी ही देखील एक प्रकारची विटंबनाच आहे, असा टोलाही शिवसेनेने हाणला आहे.

उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याचे आणि त्यांच्या राज्यकर्त्यांचे डोके अजून ठिकाणावर आलेले नाही. त्यामुळेच सीमेवर हल्ले चढवून शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या पार्थिवाची विटंबना करण्याचे धाडस पाक पुन्हा पुन्हा करीत आहे. भारतीय जवानांनी तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून विटंबनेचा सूड घेतला असला तरी हा तात्पुरताच इलाज आहे. पाकचा कायमचा बदला घेण्यासाठीही भारताने आता सज्ज व्हायला हवे, अशी अपेक्षाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात व्यक्त केली आहे.

सर्जिकल हल्ल्यानंतर पाकच्या हल्ल्यांचा जोर जास्तच वाढला आहे. आतापर्यंत त्यांनी जे हल्ले केले त्यात दुप्पट जवान शहीद झाले आहेत व यावर आमचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर बोलायला तयार नाहीत. पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकण्याची भाषा त्यांनी केली, पण त्यांच्या शाब्दिक बॉम्बनंतर पाकिस्तानने तीन जवानांना हौतात्म्यास भाग पाडले. त्यांच्या देहाची विटंबना केली. आता जाहीर सभांतून या मंडळींनी यावरही बोलायला हवेच. जर सर्जिकल स्ट्राइकचे राजकीय श्रेय घेण्याचा घाणेरडा प्रकार सुरू असेल तर मग जवानांच्या देहांची विटंबना व त्यांच्या रोजच्या हौतात्म्याची जबाबदारीही राज्यकर्त्या पक्षाला घ्यावीच लागेल, असेही उद्धव यांनी सुनावले.

काळा पैसा बाहेर काढू, हा या सगळ्यांचाच निवडणूक भाषणांतला तोफखाना होता. तसेच पाकने आमच्या एका जवानाचा शिरच्छेद केला तर त्यांची दहा मुंडकी कापून आणू, अशा आरोळ्याही या मंडळींनी त्यावेळी ठोकल्याच होत्या. पण राज्य येऊन अडीच वर्षे झाली तरी फक्त आमचीच मुंडकी उडत आहेत व पाक दहशतवाद्यांची शिरे सलामत आहेत. त्याचे अपश्रेयही राज्यकर्त्या पक्षाला घ्यावे लागेल, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *