facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / अपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार?
news-13

अपूर्ण प्रकल्पांना गती मिळणार?

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – विधान परिषद निवडणुकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा, अमळनेर तालुक्यांनी मतदारांनी भरभरून मते टाकत भाजप उमेदवार चंदुभाई पटेल यांना विक्रमी मतांनी निवडून दिले. आता याची परतफेड म्हणून जलसंपदा मंत्री महाजन यांनी या भागातील जलसंपदाच्या अपूर्ण प्रकल्पांकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या गिरणा पट्ट्याने मराठा उमेदवाराकडे पाठ फिरवत भाजप उमेदवाराला साथ दिली. तर जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील भाजपला अपेक्षित असलेली मतेही फुटली. त्यामुळे निवडणुकीच्या यशात महाजनांना साथ देणाऱ्या गिरणापट्ट्याचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. आता या पट्ट्यात अपूर्ण असलेले प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात येत आहे.

या प्रकल्पांबाबत चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी जलसंपदामंत्री यांना पत्र दिले होते. तापी महामंडळात अधिकाऱ्यांची बैठकदेखील घेतली होती. आता याला चालना देणे हे जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हातात आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर जलसंपदा मंत्री यांच्याबाबत आता अपेक्षा उंचावल्या आहेत.

या प्रकल्पांना प्रतीक्षाच

या अपूर्ण प्रकल्पांत भूमिपूजन होऊन बंद असलेला वरखेडे लोंढे, केवळ चर्चेत असलेले गिरणावरील सात बलून बंधारे, तापीचे पाणी अडवता येत नसल्याने वाहून जाताना मूकपणे पाहणारा निम्न तापी प्रकल्प, जळगाव एमआयडीसी समृद्ध करू शकेल असा शेळगाव प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. गिरणा धरणाचे कालवे अत्यंत वाईट अवस्थेत असून त्यांची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दरवर्षी या कालव्यांच्या दुरूस्तीसाठी आलेला निधी कोठे जिरत होता, याचीदेखील चौकशी होणे गरजेचे आहे. दहिगाव-जामदा बंधारे हे गाळाने भरले असल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झालेली आहे. ते पुनर्स्थापित करणे आवश्यक आहे. पाचोरा तालुक्यातील मन्याड धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव पडून आहे. या धरणाची उंची वाढवल्यास पाचोरा तालुक्याला लाभ होऊ शकतो.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *