facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / अंनिसची संविधान जागर यात्रा

अंनिसची संविधान जागर यात्रा

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – भारतीय संविधानाचा विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे २६ नोव्हेंबर २०१६ ते २६ जानेवारी२०१७ या कालावधीत ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या उपक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनाने संविधान जागर यात्रा २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान अंनिसच्या युवा कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने मुंबई व नागपूरपासून करून महू (मध्यप्रदेश) व औरंगाबाद दरम्यान प्रबोधनाने आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती नेहमीच संविधानाच्या मूल्य आशयाच्या आधारावर काम करत आली आहे. स्वातंत्र्याचे हिरक महोत्सवी वर्ष २००७ पासून समितीतर्फे संविधान बांधिलकी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत दरवर्षी संविधान संवाद सभा, संविधान सांस्कृतिक अभिव्यक्ती, संविधान संकल्प सहचिंतन, संविधान अभिवादन फेरी, चालता बोलता संविधान असे उपक्रम राबविले जातात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष देशभर साजरी केली जात आहे. याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविधांगी व्यक्तिमत्त्व,त्यांचे संविधानाच्या निर्मितीतील योगदान, भारतीय संविधानाचा मूल्यआशय आणि संविधानप्रती नागरिकांची जबाबदारी याविषयी जनतेशी संवाद साधला जाणार आहे. जागर यात्रेचा प्रारंभ २६ नोव्हेंबरला दीक्षाभूमी(नागपूर) आणि चैत्यभूमी(मुंबई)येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यात्रेतील युवा कार्यकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षपूर्ण जीवनातील महत्वपुर्ण ठिकाणांना भेट देऊन प्रामुख्याने दलितेतर समूहांमध्ये संविधान जागर करणार आहे. या यात्रेतील एक पथक नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव मार्गे औरंगाबाद असा दौरा करणार आहे.दुसरे पथक मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यातून मार्गक्रमण करत बाबासाहेबांचे जन्मठिकाण असलेल्या मध्यप्रदेशातील महू येथे पोहोचून यात्रेचा समारोप करतील.

या संविधान जागर यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र अंनिसचे २० युवा कार्यकर्ते करतील. यात महाराष्ट्रातील विविध समविचारी संस्था, संघटना, चळवळी व व्यक्तींही सहभागी होणार आहेत. यात्रेत शाळा, महाविद्यालये तसेच जाहीर कार्यक्रमांमधून संविधानाचा पोवाडा, संविधानाचे भारूड,गाणी, व्याख्याने, चालता बोलता संविधान,पोस्टर प्रदशंन,संकल्पपत्र भरून घेणे अशा विविध माध्यमातून जनसंवाद साधला जाणार आहे, असे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कळविले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *