facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / Featured / ‘एक होती चंद्रकोर’ने उलगडेना रहस्य कथा

‘एक होती चंद्रकोर’ने उलगडेना रहस्य कथा

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – गेल्या सतरा दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या ५६ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्यस्पर्धेचा गुरुवारी, रोजी वनिता बहुउद्देशीय संस्था आयोजित, विजय साळवी लिखित, जगदीश नेवे दिग्दर्शित ‘एक होती चंद्रकोर’ या नाटकाने समारोप झाला.

प्रत्येक मानवात उपजत असलेला आत्मविश्वास हा त्याच्या उत्कर्षासाठी मोठा सहाय्यकारी असतो. एकदा का हा आत्मविश्वास डगमगला तर मानवी जीवनाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. प्रत्येकात हुशारी ही असतेच मात्र ती नको तेव्हढी स्वस्त न करता तिचा वापर योग्य पद्धतीने, योग्य त्या ठिकाणी वापरली जावी. आता माझ्याने काहीच होणार नाही, या भावनेने जीवनात आलेल्या नैराश्यावर नव्या उमेदीने, ताकदीने मात केली असता नशीब नक्कीच उजळते, असा संदेश या नाटकाने दिला.

नाटकाची कथा ही नेहमीच्याच ढाच्यातील असली तरी ती एक उत्कृष्ट रहस्य कथा होती. ज्यात शोधपत्रकार असलेला राज हा राजकारणी रावसाहेब थोरात (जगदीश नेवे) यांच्या विरोधात पुरावे गोळा करीत असताना त्याचा संशयित मृत्यू होतो. पतीच्या निधनाने नैराश्यात अडकलेल्या अश्विनीस (मानसी भदादे) सावरण्यासाठी तिचा घरगडी (चंद्रवदन बच्छाव) तिला धीर देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. राजचा मृत्यू हा खून असून तो अश्विनीनेच केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी रावसाहेब पोलिसांशी संगनमत करतो. त्यात तिला अडकवण्याचा कट करीत असतानाच तिचा तो नामक मित्र तिच्यात आत्मविश्वास निर्माण करून तिला धाडसी होण्यास प्रवृत्त करून रावसाहेबाला अटक करून देण्यात मदत करतो, अशी थोडक्यात नाटकाची कथा.

उत्तम कथा सोबत असताना अभिनयिक अंगाने नाटक खूपच गळून पडले. तसे पहिले तर नाटकातील सर्वच कलावंत अनुभवी असे होते. मात्र नाटकात पाठांतराचा अभाव प्रकर्षाने जाणवला. आकाशातील चंद्राचे दिवसागणिक चन्द्रकोरेचे वाढणारे सौंदर्य काही औरच असते तसेच या नाटकाकडून खूप अपेक्षा असताना अगदी थोड्यासाठी प्रयत्न कमी पडलेत. इंस्पेक्टर झालेल्या योगेश हिवरकर हे भूमेकेला न्याय देत असताना काही ठिकाणी फिल्मी वाटले तर चंद्रवदन हे सतत खालच्या पट्टीतील आवाजातच वावरले. नाटकाचे नेपथ्य (संदीप निकम) ठीक. प्रकाश योजना (रुपेश जैसवाल) संगीत (सुरेश राजपूत) नाटकास पूरक असले तरी काही सूक्ष्म चुका काही ठिकाणी लक्षात येत होत्याच. नाटकाची वेशभूषा (वंदना नेवे) उत्तम. या अनुभवी कलाकारांनी मोठ्या लकबीने सहज प्रयोग रसिकांपुढे आणण्याचा प्रयत्न उत्तम केला हे त्यांचे यशच.

या नाटकाची संपूर्ण बेरिंग सांभाळली ती मानसी भदादे हिने. तिचे दिसणे जितके सुंदर होते तितकाच तिचा अभिनयही सुंदर होता. तिचे पाठांतर चोख होतेच तिचा वावरही आत्मविश्वासी होता. तिला साथ सर्व टीमची मिळाली असती तर या नाटकाचा प्रयोग चंद्रासारखा देखणा नक्कीच झाला असता यात शंकाच नाही. त्यांनी निवडलेली उत्तम कथा दिवंगत देविदास परदेशी या रंगकर्मीला अर्पित करण्यात त्यांचे कौतुक आहेच. नाटकातील शाब्दिक रचना उत्तम अशीच होती. मनाची अंतरशक्ती प्रज्वलित व्हावी असे संवाद या नाटकात होते. रसिकांनी त्यांना दादही दिली. भविष्यात या टीम कडून अशाच उत्तम कलाकृतीची अपेक्षा करूया.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *