facebook
Thursday , March 2 2017
Breaking News
Home / Featured / ‘करन्सी चेस्ट’ची रसद १५ टक्केच!

‘करन्सी चेस्ट’ची रसद १५ टक्केच!

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – जुन्या नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर अद्यापही स्थिती सुधरलेली नाही. बँकेच्या शाखांना करन्सी चेस्टमधून मागणीच्या फक्त १५ ते २० टक्के पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची ससेहोलपट कायम आहे.

काळा पैसा रोखण्यासाठी ५०० व १ हजाराच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा शुक्रवार, २५ नोव्हेंबर हा १७ वा दिवस होता. तर या नोटा बदलून घेण्यासंबंधीचा सोळावा दिवस होता. जवळपास अडीच आठवड्यानंतर बँकांमधील गर्दी कमी झाल्याचा अनुभव आहे. पण एटीएम ठप्प असण्यासोबतच अनेक शाखांमध्ये ठणठणाट असल्याने नागरिकांचे हाल कायम आहेत.

नोटाबदली करण्यासंबंधीचा पहिला टप्पा गुरुवार, २४ नोव्हेंबरला संपल्यानंतर शुक्रवारपासून नवीन टप्पा सुरू झाला. यांत १ हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद झाल्या. त्या केवळ बँकेत जमा करता येणार आहेत. तर सरकारी देयकांसोबत पेट्रोल पंपांसाठी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनात आहेत. बँक खात्याव्यतिरिक्त नोटा आता बदलीदेखील करता येणार नाहीत. अशा सर्व नवीन नियमावलीनुसार, शुक्रवारचा दिवस उजाडला, त्यावेळी बँकांत फार गर्दी नव्हती. पण, नोटाच उपलब्ध होत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘नागपूर शहरात विविध बँकांच्या जवळपास २५० शाखा आहेत. यापैकी बहुतांश सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. ९० टक्क्यांहून अधिक बँकेच्या शाखांना साधारणत: रोज १.६० ते १.७५ कोटी रुपयांची रोख लागते. पण करन्सी चेस्टमधून त्यांना फक्त १५ ते १७ लाख रुपयांची रोख दिली जात आहे. यामध्ये ५०० च्या नवीन नोटा तर फक्त १.५० लाखांच्या असतात. तर २ हजार रुपयांच्या नवीन नोटांचे चार ते सहा बंडल असतात. उर्वरित १०० च्या नोटा. पण हा पैसा पुरतच नाही. यामुळे दुपारच्या आधीच रोख वितरण बंद करावी लागत आहे,’ असे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे बँकांमधील गर्दी कमी झाली असली तरी एटीएम रिकामेच आहेत. स्टेट बँक वगळता उर्वरित सर्व सरकारी बँकांचे एटीएम ठप्प आहेत. पहिला फोकस बँकेच्या शाखांकडे त्यात रोखच नाही. तर स्टेट बँकेचेदेखील अगदी थोडेच एटीएम सुरू आहेत. खासगी बँकांचे एटीएम थोड्या-फार प्रमाणात सुरू आहेत. पण त्यात १०० च्या नोटा नसल्याने पंचाईत होत आहे. केवळ २ हजार रुपयांची नवीन नोट असल्याने ज्यांच्या खात्यात तितके पैसे नाहीत, अथवा ज्यांना केवळ ३००, ४००, ५०० किंवा ७०० रुपयांचे काम आहे, त्यांना भीषण त्रास होत आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयाचा भीषण त्रास सामान्य नागरिकांना १७ दिवसानंतरही कायम आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *