facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर

नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या थेट पाइपलाइन योजनेच्या कामांत त्रुटी आहेत. या योजना पूर्णत्वाला नेण्याबाबत अधिकारी गंभीर नाहीत. देखरेखीसाठी तज्ज्ञ अधिकारी नाहीत. या पद्धतीत सुधारणा न झाल्यास थेट पाइपलाइनची अवस्था शिंगणापूर योजनेसारखी करणार का? असे झाले तर योजनेचे वाटोळे होईल. ढपले पडलेले पाइप टाकण्याचे काम सुरु असताना त्याकडे लक्ष नाही. योजनेत कुणी कुणी ढपले पाडले, याची चौकशी करावी, असा हल्लाबोल नगरसेवकांनी प्रशासनावर केला. महापालिकेची तहकूब सभा शुक्रवारी झाली. त्यावेळी नगरसेवकांनी पाइपलाइन योजनेची ‘टॉप टू बॉटम’ माहिती विचारली, पण प्रशासनाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पाइपलाइन योजनेच्या कामावर देखरेखीसाठी सुकाणू समितीची पुनर्स्थापना व प्रशासनाकडून पंधरा दिवसांतून एकदा कामाचा आढावा ‘स्थायी’ला सादर करण्याचा निर्णय झाला. तीन तासांहून अधिक काळ पाइपलाइन योजनेवरच चर्चा झाली. मात्र प्रशासन मात्र ढिम्मच दिसून आले. ३६ किलोमीटर पाइपलाइन मार्गाला परवानगी मिळाली असून १८ किलोमीटरपर्यंत पाइप टाकल्याची तसेच डिसेंबरपर्यंत सर्व परवानग्या घेऊ, अशी जुनीच उत्तरे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ताराराणी आघाडीचे नेते व नगरसेवक सुनील कदम यांनी पाइपलाइन योजनेचे काम महापालिकेचे अधिकारी सक्षमपणे करु शकत नाहीत. २०२१ पर्यंत ही योजना पूर्ण होणार नाही. प्रकल्प दर्जेदार व लवकर होण्यासाठी योजनेचे काम राज्य सरकारकडे सोपवूया. सरकारच्या उच्चसस्तरीय अधिकाऱ्यामार्फत काम होण्यासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

पाइपलाइनसाठी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी आमदारकी पणाला लावली. शेकडो कोटी निधी आणला, पण योजनेसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरले. प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तच त्याला जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला. तर योजनेचा कालावधी लांबल्याने निधीची कमतरता भासणार आहे. पाइपची टेस्टिंग होत नाही. गुणवत्ता नाही. योजनेत कुणी कुणी ढपले पाडले याची चौकशी झाली पाहिजे. ज्या कंपनीने योजनेचे टेंडर केले त्याचीच थर्ड पार्टी ऑडीट म्हणून नेमणूक झाल्याने चोराच्या हाती किल्ल्या सोपविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केला.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *