facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / वाहन खरेदीला ब्रेक

वाहन खरेदीला ब्रेक

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात उलाढाल वाढली. इतर व्यवसायात मंदी असतानाही कोल्हापूर जिल्हा दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहन खरेदीत राज्यात आघाडीवर होता. उसाला मिळणारा चांगला दर, दूध आणि उद्योग व्यवसायातील उलाढाल तसेच सरकारी नोकरांचा वाढलेला पगार यामुळेच वाहन खरेदीत कोल्हापूर फास्ट आहे, पण नोटाबंदीचा मोठा दणका या व्यवसायाला बसला आहे. पंधरा दिवसांच्या परिस्थितीवरून नोव्हेंबरमध्ये केवळ पन्नास कोटींचीच उलाढाल होण्याची शक्यता असून, शंभर कोटींच्या व्यवसायाला दणका बसणार आहे.

जिल्ह्यात दरमहा सहा ते सात हजार चारचाकी व अवजड वाहनांची विक्री होते. नऊ ते दहा हजार दुचाकी नवीन वाहने रस्त्यावर येतात. यामुळे चारचाकी वाहन व्यवसायात साधारणतः ३२ ते ३५ कोटींची, तर दुचाकी खरेदी-विक्री व्यवहारात ७० ते ७५ कोटींची उलाढाल होते. म्हणजे सव्वाशे कोटीपेक्षा अधिक उलाढाल केवळ नवीन वाहन खरेदीत होते. याशिवाय जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीतही ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते. दीडशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असल्याने कोल्हापूरची श्रीमंती सतत चर्चेत असते.

नोटाबंदीमुळे गेल्या पंधरा दिवसात वाहन खरेदी-विक्री थंडावल्याने डीलर अस्वस्थ आहेत. आगामी दोन महिने तरी हीच स्थिती राहण्याची स्थिती आहे. नोटाबंदीपूर्वी जी उलाढाल होत होती, त्याच्या निम्मीही उलाढाल नाही. यामुळे किमान शंभर कोटींची उलाढाल थंडावली आहे. वाहन खरेदीसाठी लोकांकडे पैसेच नसल्याने खरेदी लांबणीवर पडत आहे. दुचाकी वाहन खरेदी करणारा निम्मा वर्ग सर्व रक्कम रोख देणारा असतो. उर्वरित निम्मा वर्ग निम्मी रक्कम रोख, तर निम्मी कर्ज प्रकरण करून देतो. पण नोटाबंदीमुळे लोकांकडे पैसेच नसल्याने दुचाकी खरेदी थांबली आहे. हीच अवस्था चारचाकी खरेदीची आहे. शक्यतो लोक चारचाकी खरेदी करताना कर्ज प्रकरणाचा आधार घेतात, पण काही रक्कम डाउनपेमेंट म्हणून द्यावी लागते, पण ती देण्यासाठीही रक्कम नसल्याने अडचण झाली आहे. ऊस आणि दुधाचे बिलच न मिळाल्याने वाहन खरेदी करणारा मोठा वर्ग वाहनखरेदीसाठी फिरकत नाही. कर्ज देणाऱ्या सहकारी, जिल्हा बँका आणि पतसंस्था सध्या बंद आहेत. त्यामुळे कर्ज मिळणे अवघड झाले आहे. जुनी वाहने खरेदी-विक्रीत रोखीचा व्यवहार जास्त होतो, पण नोटाच नसल्याने व्यवहार थंडावला आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. त्यामुळे रोजच्या अत्यावश्यक बाबींवरच खर्च केला जात आहे. नोटा चलनात आल्यानंतरच वाहन खरेदी करण्याची लोकांची मानसिकता आहे. डाउनपेमेंटसाठीही लोकांकडे रक्कम नसल्याने वाहन खरेदी-विक्री व्यवसायाला फटका बसत आहे.

विशाल चोरडिया, युनिक ऑटो

जुनी वाहने घेणारा माणूस जास्तीत जास्त रक्कम रोख देत असतो. येथे कर्ज प्रकरण करण्याची मानसिकता फार कमी आहे. पण रोख रक्कम देण्यास नोटाच नसल्याने जुन्या वाहनांची खरेदी ठप्प आहे. ज्यांच्याकडे रक्कम आहे, त्यांना प्राप्तिकराची भीती असल्याने ते धाडस करत नाहीत. यामुळेही जुन्या वाहनांचा बाजार एकदम शांत आहे.

प्रदीप वाघमोडे, साई सर्व्हिस

‘प्राप्तिकर’चा ससेमीरा कशाला?

जुन्या नोटा खपविण्यासाठी काहींनी जुन्या वाहनांच्या खरेदीला पसंती दिली, पण नंतर प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती वाटू लागल्याने खरेदी बंद झाली. काहींना जुने वाहन विकून नवीन घ्यायचे आहे, पण जुन्याची खरेदीच बंद झाल्याने नवीन खरेदीचा प्रश्नच येत नाही. १५ ते २० लाखांची गाडी घेणारा मोठा वर्ग कोल्हापुरात आहे. सर्व रक्कम कर्ज दाखवून गाडी घेण्यास तो तयार आहे, पण सरकार रोज एका चौकशीची घोषणा करत असल्याने प्राप्तिकरचा ससेमिरा नको, असा सल्ला सीए देत असल्याने त्यांनी कशाला धाडस करायचे म्हणत खरेदी पुढे ढकलत आहेत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *