facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / पेट्रोलिंगऐवजी पोलिस चॅटिंगमध्ये गुंग
aawaz-news-image

पेट्रोलिंगऐवजी पोलिस चॅटिंगमध्ये गुंग

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – रस्त्यांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना पेट्रोलिंग करावे लागते. त्यासाठी वाहनासह स्वतंत्र यंत्रणाही आहे, पण पेट्रोलिंग करण्याऐवजी पोलिस सोशल मीडियावर चॅटिंग किंवा गेम खेळण्यात गुंग असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या अशा काही मोजक्या पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात पेट्रोलिंगसाठी जुना राजवाडा व लक्ष्मीपुरीसाठी एक व्हॅन आहे. दुसरी व्हॅन राजारामपुरी व शाहूपुरी पोलिस ठाण्यासाठी आहे. दोन्ही पोलिस ठाण्यातील पुरूष व महिला पोलिसांची नियुक्ती पेट्रोलिंगसाठी केली जाते. दर एक तासाला पोलिस व्हॅन पोलिस ठाण्याच्या प्रमुख चौकात न्यायची असते. त्यानंतर पोलिसांनी पेट्रोलिंग करायचे असते. मात्र बहुतेक वेळेला पेट्रोलिंगसाठी असलेली व्हॅन एकाच ठिकाणी उभी असलेली दिसते. पोलिस पेट्रोलिंग करण्याऐवजी व्हॅनमध्ये बसून मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा चॅटिंग करत असतात. काही पोलिस कर्मचाऱ्यांचा गप्पांचा फड रंगलेला असतो.

सध्या शिवाजी पुतळ्याजवळ लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्याची पोलिस व्हॅन पेट्रोलिंगसाठी असते. तेथील पोलिस पेट्रोलिंगऐवजी व्हॅनमध्येच बसून असल्याचे चित्र दिसून येते. शिवाजी चौक हा शहरातील हॉटस्पॉट असून या चौकात रिक्षा, वडाप वाहनांमुळे सतत कोंडी होत असते. वाहनधारकांत खटके उडत असतात. फेरीवाल्यांनीही हा चौक व्यापला आहे. माळकर तिकटीजवळ एकच वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियोजन करत असतो. येथील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिसाला मदत करण्यासाठी व्हॅनमधील पोलिसांनी मदत केली तरी वादाचे प्रसंग कमी होऊ शकतात. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक कर्णकर्कश हॉर्न वाजवत असतानाही व्हॅनमधील पोलिस जागचे हालत नाहीत. हीच स्थिती ज्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी व्हॅन उभी असते तिथेही पाहायला मिळते.

वाहतूक नियोजबरोबर शहरात पाकिटमार, बॅग चोरी, वाहनांच्या काचा फोडून पैसे चोरणे, घरफोड्या अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आहे. या प्रकाराला पेट्रोलिंगमुळे चाप बसू शकतो, पण पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना याचे भान नसते. वरिष्ठ अधिकारीही पेट्रोलिंग कुठे चालले आहे, याची माहिती घेत नसल्याने कर्मचाऱ्यांचे फावले आहे. सोशल मीडियावर दंग असलेल्या पोलिसांना पेट्रोलिंग करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

गुन्ह्याचे वाढते प्रकार

१५ वर्षापूर्वी पोलिस अधीक्षक आर.के. पद्भनाभन यांनी प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्तास ठेवला होता. या निर्णयामुळे तलवार हल्ले, चोऱ्या आणि भांडणे यांसारखे गुन्हे कमी व्हायला मदत झाली होती, पण गेल्या पंधरा वर्षांत चेन स्नॅचिंग, घरफोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलिंगची गरज जास्त भासत आहे.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *