facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / सूचनांचा झेडपीला अडसर
news-14

सूचनांचा झेडपीला अडसर

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – जलयुक्त शिवार योजनेत पाझरतलाव साठवण बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना पंधरा लाखांपर्यंतची कामे प्रस्तावित करण्याची सूचना कृषी विभागाने जिल्हा परिषदेस केली आहे. या अटीमुळे जिल्हा परिषदेची जलयुक्तची अनेक कामे अपूर्ण राहणार असल्याने सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाची ही अट मागे घेण्याची मागणी करत, तसा ठरावच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत करण्यात आला आहे.

जलयुक्त शिवार योजनेत जिल्हा परिषदेला दुरुस्तीची कामे देण्यात आली आहेत. यामध्ये पाझरतलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, साठवण बंधाऱ्यांच्या कामांची दुरुस्ती केली जाणार आहे. ही दुरुस्तीची कामे प्रस्तावित करताना एका गावात जास्तीत जास्त पंधरा लाखांपर्यंतचीच कामे असावीत, अशी अट कृषी विभागाने टाकली आहे. या अटीमुळे जिल्हा परिषदेची चांगलीच पंचाईत झाली आहे.

एका गावात १५ लाखांपुढील कामे लघु पाटबंधारे विभागास करता येणार नाहीत. त्यामुळे अनेक दुरुस्तीची कामे होणार नसल्याची भीती सदस्य व्यक्त करत आहेत. कृषी विभागाने ही अट मागे घेतल्यास अडचणी दूर होणार असल्याने सदस्यांनी ही मागणी लावून धरली आहे. जलव्यवस्थापन समिती सभेत तसा ठराव घेण्यात आल्याने कृषी विभाग काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

मंजुरी देण्याची मागणी

जलयुक्त शिवार योजनेतील गावांच्या निवडीमध्ये जिल्हा परिषदेस डावलले गेले. त्यानंतर या योजनेत फक्त दुरुस्तीचीच कामे देण्यात आली असल्याने पदाधिकारी सदस्य नाराज झाले. आता कृषी विभागाच्या या नव्या अटीमुळे त्यांच्या नाराजीत वाढ झाली आहे. कृषी विभागाकडून कामांना मंजुरी देतानाही अडवणूक केली जात असल्याचे अधिकारी खासगीत बोलत असतात. आताही जिल्हा परिषदेने पंधरा लाखांपुढील दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव कृषी विभागास सादर केले आहेत. अट वगळून या प्रस्तावांना मंजुरी देण्याची मागणी सदस्यांनी केली आहे.

Check Also

news-14

सुशीकुमार शिन्देकडून शहीद कुणाल गोसावी परिवाराचे सांत्वन

आवाज न्यूज नेटवर्क –  पंढरपूर – (प्रतिनिधी – नागेश सुतार) – शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *