facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / २६/११ च्या आठवणींनी उडते झोप
news-10

२६/११ च्या आठवणींनी उडते झोप

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – विजय कमळे, जालना
मुंबईत २६/११ ला झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज तब्बल आठ वर्ष पूर्ण झाले. तरी त्या काळ्या दिवसाची आठवण येताच आजदेखील डोळ्यातून अश्रू येऊन रात्रीची झोप उडते. त्यादिवशी प्रत्यक्ष मृत्यूला डोळ्यासमोरून जाताना पाहिले मात्र, कुटुंबियांचा आधार, देशवासियांचा प्रेम आणि अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे जणू माझा पुनर्जन्मच झाला, अशी भावनिक प्रतिक्रिया जालन्यातील जवान समाधान मोरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
सध्या जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले हवालदार समाधान शंकर मोरे हे २६/११ च्या हल्ल्याच्यावेळी मुंबईतील नागपाडा पोलिस ठाण्यात बंदोबस्तावर नेमणुकीस होते. राज्य राखीव पोलिस बल गट क्र. तीनच्या कंपनीत कर्तव्य बजावत होते. तेथेच कुलाबा जवळ फायरिंग झाल्याची माहिती त्यांनी वायरलेसवर ऐकली. स्थानिक गुंडांमधील टोळी युद्धाचा हा प्रकार असावा, असे प्रथमदर्शनी वाटले. मात्र, मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला असून अतिरेक्यांनी हॉटेल ताजमधे काही विदेशी पर्यटकांना ओलिस ठेवल्याने त्यांच्या एसआरपीच्या कंपनीला तेथे पाचारण करण्यात आले.
याठिकाणी अतिरेक्यांशी त्यांची फायरिंग झाली. एके ४७ सारख्या अत्याधुनिक हत्यारांशी सुसज्ज असलेल्या अतिरेक्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे मात्र, साधारण थ्री नॉट थ्री रायफल होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीत ते काहिशे हताश झाले होते. परंतु वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील हे बेधडकपणे आपल्याजवळील रिव्हॉल्वरने अतिरेक्यांशी एकाकी झुंज देत होते. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही सर्व जन देखील जीवाची पर्वा न करता त्यांच्या नेतृत्वाखाली कॉउंटर फायर सुरू केले.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हॉटेल ताजच्या चौथ्या मजल्याकडे धाव घेतली. जिथे अतिरेक्यांनी काही विदेशी पर्यटकांना ओलिस ठेवले होते. यावेळी आम्हाला रोखण्यासाठी अतिरेक्यांनी जाळपोळ आणि ग्रेनेड हल्ले सुरू केले. आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुरामुळे आम्हाला श्वास घेणेही अवघड झाले होते. अशा बिकट परिस्थित अतिरेक्यांशी झुंज देत आम्ही ओलिसांची सुटका करीत होतो. या हल्ल्यात अनेक सहकाऱ्यांना विरमरण आले. दरम्यान, वरच्या मजल्यावरून एका अतिरेक्याने केलेल्या हँड ग्रेनेडच्या हल्ल्यात समाधान मोरे गंभीर जख्मी झाले होते.
या हल्ल्यातून बरे व्हायला त्यांना तब्बल सहा महिन्यांच्या कालावधी लागला. दरम्यान, यानंतर राज्य राखीव पोलिस दलाचे तत्कालीन सहायक समादेशक के. एन. मिटकर आणि पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संभाजी कदम यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळत असून सरकारकडून देखील योग्य मदत मिळाल्याचे मोरे यांनी सांगितले.

पुरस्कार आणि रिवार्डचा वर्षाव
दरम्यान, या हल्ल्याच्यावेळी जीवाची बाजी लावून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समाधान मोरे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार आणि पोलिस महासंचालकांचा पोलिस पदक देऊन गौरविण्यात आले. याव्यातिरिक्त औरंगाबाद आणि नागपूर येथील पोलिस महानिरीक्षकांनी ही रिवार्ड देऊन त्यांचा गौरव केला.
आरोग्याशी झुंज सुरू
२६/११ च्या हल्ल्याच्यावेळी अतिरेक्यांशी झुंज देणाऱ्या जाबाँज जवान मोरेला २०१३ मध्ये अचानक ब्रेन हॅँम्ब्रेज झाला. त्यामुळे तब्बल ३५ दिवस ते कोमामध्ये होते. परंतु, प्रचंड इच्छाशक्ती आणि सर्वांच्या प्रेरणेमुळे आजाराशी ते कडवी झुंज देत असून त्यांच्या तब्येत आता आमूलाग्र सुधारणा होत आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *