facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / आधी पोलिसच, मग सर्वसामान्य !

आधी पोलिसच, मग सर्वसामान्य !

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – शहरात हेल्मेट सक्ती लागू झाली असली तरी तुर्तास ती पोलिसांपुरती मर्यादीत ठेवण्यात आली आहे. दुचाकी वापरणाऱ्यांना मात्र हेल्मेटचा वापर न करणाऱ्या पोलिसांकडूनच चक्क दंड वसूल केला जातो आहे. वाहतूक नियमांचे पोलिसांनीच काटेकोर पालन केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हेल्मेट सक्तीचा दंडक लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी आग्रही असलेल्या पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार हेल्मेट घातल्याशिवाय दुचाकीवरून येणाऱ्या पोल‌िस कर्मचाऱ्यांना आयुक्तालयासह त्यांच्याच पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश देण्यात येत नाही. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात अनेकदा हेल्मेट सक्तीचा प्रयोग राबवण्यात आला. मात्र, वेळोवेळी ठराविक दिवसानंतर सदर आदेश धाब्यावर बसवण्यात येतो. काही महिन्यांपूर्वी प्रादेश‌िक परिवहन विभागाने जोरदार मोहीम हाती घेत वेगवेगळ्या महामार्गावर कारवाई केली होती. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांना एक डाक्युमेंटरी दाखवत त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. मात्र, आरटीओची कारवाई थंडावली तसे हा निर्णय मागे पडला. आता, पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. वाहतूक दंडात मोठी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिंगल यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. आता, हेल्मेट सक्तीच्या दिशेने त्यांनी पाऊल उचलले आहे. मात्र, कायदा समान असून, प्रथम पोलिसांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. थेट हेल्मेट सक्ती करण्याऐवजी त्यांनी पोलिसांपासून त्यांची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. दुचाकी वापरणारे पोलिसच हेल्मेटचा वापर करणार नसेल तर सर्वसामान्यांवर कारवाई कशी करायची, या हेतूने पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला. यामुळे दुचाकी वापरणाऱ्या वाहनचालकास पोलिस स्टेशन तसेच पोलिस आयुक्तालयात प्रवेश नाकारला जातो आहे. एवढेच नव्हे; तर अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे. पोलिस आयुक्तांच्या या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. यासह पोलिस आयुक्तालय, वाहतूक कार्यालय, उपआयुक्त कार्यालय तसेच सर्व पोलिस स्टेशनच्या प्रवेशद्वारावर हेल्मेटशिवाय प्रवेश नसल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.

आजमितीस हेल्मेट सक्तीचा निर्णय पोलिसांपुरता मर्यादीत आहे. सर्वसामान्यांवर तशी सक्ती करण्यात आलेली नाही. मात्र, शहर पोलिस दलातील दुचाकीचालकांनी १०० टक्के हेल्मेटचा वापर सुरू केला की, टप्प्याटप्प्याने शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्यात येईल. सक्ती करण्यापेक्षा वाहनचालकांनी उत्स्फुर्तपणे हेल्मेट वापरावे.

– जयंत बजबळे, सहायक पोलिस आयुक्त
मटा भूमिका
दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, या उक्तीचा प्रत्यय शासकीय कामकाजात नेहमीच येतो. पण नाशिक पोलिसांनी हा समज खोटा ठरविण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करतांना सर्वप्रथम ती कायद्याचे रक्षक या नात्याने पोलिसांपासूनच करण्याचा पोलिस आयुक्तांचा निर्णय सर्वसामान्यांच्यादृष्टीनेही अनुकरणीय आहे. वाहतूक नियमांचे पोलिसांनीच कठोर पालन केले तर त्याचा योग्य तो संदेश जनतेपर्यंत जातो. त्याचदृष्टीने पोलिसांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवायची नाही, अन् नियमभंग केला तर दंड भरावा लागेल या आदेशाची पहिल्याच दिवशी यशस्वी अंमलबजावणी झाल्याने बोले तैसा चाले या उक्तीचाही प्रत्यय आला. आता याबाबतीत आरंभशूरपणा न करता ही सक्ती कोणत्याही कारणास्तव शिथिल होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *