facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / Featured / नगरपालिकांसाठी आज मतदान

नगरपालिकांसाठी आज मतदान

आवाज न्यूज नेटवर्क –

जळगाव – जिल्ह्यातील १३ नगरपालिकांची आज, रविवारी (दि. २७) सार्वत्रिक निवडणूक होत असून शनिवारी मतदानाच्या तयारीला अंतिम रूप देण्यात आले. सर्वत्र मतदानाची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. राजकीय वातावरणही ढवळून निघाले असून दिग्गजांच्या लढतींकडे जनतेचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांतील पक्षीय परिस्थिती पाहता अनेकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांच्या १६६ वॉर्ड मधून ३२० नगरसेवक निवडून जाणार आहेत. यासाठी १,३५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात ६८० पुरूष तर ६७३ महिला उमेदवार आहेत. या शिवाय बारा नगरपालिकांत थेट नगराध्यक्ष निवडही होणार आहे. यासाठीही मोठी चुरस असून एकूण ६९ उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. यात ३५ पुरूष तर ३४ महिलांचा समावेश आहे. एकंदरीत महिला-पुरूष समानता येथेही पाहायला मिळत आहे. पुरुषांच्या बरोबरीलाच महिलाही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. बोदवडला नगरपंचायत असून तेथे नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडला जाईल. जिल्ह्यात एकूण ८३८ मतदान केंद्रांवर ६ लाख २१ हजार २५८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

४७ केंद्रे संवेदनशील

या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झालेले आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ मुख्य निवडणूक निरीक्षक, ५ निवडणूक निरीक्षक, १३ निवडणूक निर्णय अधिकारी, ७८२ मतदान केंद्र अध्यक्ष, १५६४ मतदान अधिकारी ७८२ शिपाई नियुक्त केले आहे. जिल्ह्यात ४७ मतदान केंद्रे ही संवेदनशील असून तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यावर विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून २ अप्पर पोलिस अधीक्षक १४ उपअधीक्षक, ३० पोलिस निरीक्षक, १५५ उपनिरीक्षक, २९०० पोलिस कर्मचारी, १३०० होमगार्ड नियुक्त केले गेले आहे. मतदानासाठी पैसे वाटले जाण्याची शक्यता असल्याने ५२ भरारी पथके सज्ज ठेवली गेली आहेत.

दिग्गजांचा लागणार कस

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ठिकाणी राजकीय सोयीसाठी आघाडी करण्याला प्राधान्य दिले आहे. एकूण जिल्ह्यात भाजपचा वरचष्मा असून आगामी काळात हीच स्थिती रहावी यासाठी भाजपने बहुतेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. तर काही ठिकाणी आघाडी केली आहे. भुसावळ नगरपालिका भाजपच्या हातात येण्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी लक्ष घातल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अस्तित्वाची ही परीक्षा आहे. पाचोरा येथे माजी आमदार दिलीप वाघ आणि आमदार किशोर पाटील यांच्यात लढत आहे. चाळीसगावमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख आणि आमदार उन्मेष पाटील यांच्यात टक्कर आहे. धरणगावमध्ये माजीमंत्री गुलाबराव देवकर आणि सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांची लढत आहे. चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि मनसे यांनी आघाडी केली असून शिवसेनेला एकाकी लढत द्यावी लागत आहे. निवडणुकीत स्थानिक आघाडींचेच प्राबल्य दिसत असल्याने कोणता पक्ष विजयी होतो, यापेक्षा कोणती आघाडी सत्तेवर येते, याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

चाळीसगावात १४७, पाचोऱ्यात ९८ उमेदवार

चाळीसगाव : नगरपरिषदेच्या १७ प्रभागातील ३३ जागांसाठी व पाचोरा नगर परिषदेच्या १३ प्रभागातील २६ जागांसाठी तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी आज रविवारी (दि. २७) मतदान होणार आहे. चाळीसगावात १४७ तर पाचोरा नगर परिषदेसाठी ९८ उमेदवार रिंगणात असून दोघंही ठिकाणच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चाळीसगाव शहरात एकूण १०३ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ८१,३०५ मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी १०३ मतदान केद्रांची रचना करून मतदान यंत्राची तपासणी व सिलिंग झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी २०० पोलिस कर्मचाऱ्यांसह १५० गृहरक्षक (होमगार्ड) दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. पाचोरा येथे ६३ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून ४९ हजार २१ मतदार हक्क बजावणार आहे. शहरातील ६ संवेदनशील मतदान केंद्रावर खबरदारी घेण्यात येत आहे.

उद्या मतमोजणी

चाळीसगाव नगर परिषदेसाठी १७ प्रभागातील ३३ जागांसाठी होणाऱ्या मतदानाची मतमोजणी सोमवारी (दि. २७) सकाळी ९ वाजेपासून शहरातील न्यायालयाशेजारील उड्डाणपुलाला लागून असलेल्या बॅटमिंटन जिमखाना येथे होणार आहे. शहरातील मतदान केंद्रासह मतमोजणीसाठी निश्चित जिमखान्यातील स्थळाची पहाणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामींसह निवडणूक निर्णय अधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील, पोलिस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, नायब तहसीलदार विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

निवडणूक तयारी पूर्ण

रावेर : नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून एकूण ३२ बूथवर मतदान यंत्रासह साहित्य रवाना करण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासूनच तहसील कार्यालयात मतदान प्रक्रियेसाठी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व १६ नगरसेवकपदासाठी ही निवडणूक होत आहे. २५० कर्मचारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुमारे २४ हजार मतदार असून ३२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

तीन दिवस दारूबंदी

भुसावळ : निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पैसे वाटप, अफवा पसरवणे यासह अफरातफरीचे वातावरण पसरू नये आणि मतदान शांततेत पार पडावे, यासाठी पोलिसदल सक्रिय झाले आहे. विशेष बंदोबस्तासह अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील या भुसावळला तळ ठोकून राहातील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दि. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस दारूबंदी केलेली आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *