facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / नगरमध्ये हुडहुडी; पारा ६.६ अंशावर

नगरमध्ये हुडहुडी; पारा ६.६ अंशावर

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगरमध्ये शनिवारी सकाळी नीचांकी तापमान ६.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. २००७ मध्ये ७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. गेल्या दहा वर्षांतील रेकॉर्ड यावेळी मोडले गेले आहे.

शनिवारी सरासरीच्या तुलनेत पारा आठ अंश सेल्सिअसने घसरला. त्यामुळे पहाटे बोचणारी थंडी जाणवत होती. दिवसाचे तापमान मात्र, सरासरीपेक्षा तीन अंशाने जास्त म्हणजे ३३.६ अंश सेल्सिअस होते. नगरमध्ये २००७ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी ७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये ७.४, २००८ मध्ये ९.३ तर २०११ मध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आतापर्यंतचे नगरमध्ये नोव्हेंबरमधील नीचांकी तापमान ५.६ अंश सेल्सिअस आहे. २१ नोव्हेंबर १८९२ मध्ये ते नोंदले गेल्याची माहिती वेधशाळेच्या संकेतस्थळावर आहे.

यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यातच थंडी जाणवू लागली होती. १० नोव्हेंबरला पारा ८.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. त्यानंतर २१ नोव्हेंबरला ७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही दिवस थंडी कमी झाली आणि पुन्हा तापमान कमी होण्यास सुरवात झाली. शुक्रवारी पारा पुन्हा सात अंशापर्यंत खाली आला आणि शनिवारी पारा थेट ६.६ अंशावर घसरला आहे. मात्र, नगरमध्ये नोंदल्या जाणाऱ्या तापमानाबद्दल स्थानिक तज्ज्ञांचे मात्र वेगळे मत आहे. नगरचे स्वयंचलित हवामान केंद्र भिंगारनाल्याच्या जवळ आणि खोलगट भागात असल्याने तेथे शहरातील सर्वांत कमी तापमान असते. तेथील तापमान म्हणजे संपूर्ण शहराचे तापमान म्हणता येत नाही, असा दावा स्थानिक तज्ज्ञ करतात.

रब्बीच्या पिकांसाठी थंडी आवश्यक असली तरी प्रमाणापेक्षा खाली गेलेले तापमान पिकांसाठी अपायकारक ठरण्याचा धोका आहे. घसरलेल्या तापमानाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *