facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / सुरांनी वातावरण भारले

सुरांनी वातावरण भारले

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – कानात साठवून ठेवावा असा संतूरचा एक- एक स्वर रसिकांना तृप्त करत होता, विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. संतूरच्या स्वरांसह पं. कैवल्यकुमार यांनीही मैफलीत रंग भरले.
निमित्त होते, मित्रा फाउंडेशन तर्फे पंडित फार्मस येथे आयोजित मित्रा महोत्सव या संगीत मैफलीचे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते झाले. डॉ. एस. व्ही. गोखले, धनंजय गोखले, मिलिंद मराठे या वेळी उपस्थित होते.
गुलाबी थंडी आणि प्रसन्न वातावरणाने सजलेल्या मैफलीची सुरुवात पं. शर्मा यांनी तितक्याच सुंदर मारवा या रागाने केली. पं. शर्मा यांनी रूपक तालात मारवा राग बांधला. पं. योगेश शमसी यांची तबलासाथ हा स्वतंत्र आविष्कार होता. दिलीप काळे यांनी तानपुऱ्याची साथ केली. पं. शर्मा यांनी आलाप, जोड, बंदिश यातून राग विस्तार केला. पुढे द्रुत तीन तालातील बहारदार वादनाने अनोखा रंग भरला. मिश्र कौशिक धुनीमधून पंडितजींनी उपशास्त्रीय संगीताची मेजवानी रसिकांना दिली.
उत्तरार्धात पं. कैवल्यकुमार यांनी छायानट या रागाने मैफल सजवली. पं. रामदास पळसुले यांनी तबला तर सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमवर सुरेख साथसंगत केली. पं. कैवल्यकुमार यांच्या ताना,हरकती रसिकांची दाद मिळवून गेल्या.
शास्त्रीय संगीत व चित्रपट संगीत हे दोन विचार आहेत. शास्त्रीय संगीत शिकणारे फक्त शास्त्रीयच वाजवतात. काही चित्रपट संगीतकार शास्त्रीय शिकून दोन्हीकडे प्रयोग करतात.
– विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा
आज महोत्सवात
आज, रविवारी या महोत्सवात उस्ताद शुजात खान यांचे सतारवादक रंगणार आहे. कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन ऐकण्याची रसिकांना संधी असून, त्यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *