facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / बँकांना सुटी, एटीएमवर रांगा
27-november-new-12

बँकांना सुटी, एटीएमवर रांगा

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याच्या निर्णयाला जवळपास तीन आठवडे होत असले, तरी त्याचे पडसाद बाजारपेठेत अजूनही उमटत आहेत. सर्वाधिक फटका बसलेली किरकोळ बाजारपेठ शनिवारी आठवड्याची सुटी असल्याने शांत होती. दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. पण, चौथा शनिवार असल्याने बँकांही बंद होत्या. त्यामुळे शहरातील निवडक एटीएम सेंटरवर दिवसभर गर्दी दिसत होती.

चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद गेल्या आठवड्याच्या तुलनेत सर्वाधिक जाणवले. बाजारपेठेला साप्ताहिक सुटी असल्याने त्याची तीव्रता कमी होती. बँका बंद असल्याने स्टेट बँक आणि इतर निवडक बँकांच्या एटीएमवर रांगा दिसत होत्या. लोकांच्या हातात पैसे नसल्याने शहरातील किरकोळ व्यापार धीम्यागतीनेच सुरू होता.

बँकांमध्ये नोटा बदलून देण्याची प्रक्रिया बंद झाली असली तरी खात्यावरून चेकने रक्कम काढता येत असल्याने ते सोयीचे होते. पण, बँकांना शनिवार व रविवार सलग दोन दिवस सुटी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एटीएममधून काही ठिकाणीच शंभरच्या नोटा मिळतात, इतर ठिकाणी दोन हजारची नोट मिळत असल्याने दिवसभरात काहींचा गोंधळ झाला. नाईलाजाने दोन हजारची नोट घेऊन त्याचे सुटे करण्यात अनेकांना वेळ खर्ची करावा लागला.

ज्या ठिकाणी एटीएममधून शंभरच्या नोटा मिळत होत्या तेथे मशीनमधून दोन हजारची रक्कम मागितल्यास दोन हजारची एकच नोट मिळत होती. तेथे नागरिकांनी १९००, १७०० अशा रक्कम देऊन पैसे काढून घेण्याचा प्रकार आजही सुरू होता. मात्र, मशीनधील शंभरच्या नोटा संपल्यानंतर पुन्हा नागरिकांना दोन हजारच्याच नोटेचा पर्याय राहिला. शंभरच्या नोटा न मिळालेल्यांची पंचाईत झाली. यात सामान्यांपेक्षा रोजचे किरकोळ व्यवहार करणाऱ्या व्यापारी, दुकानदारांची संख्या अधिक होती.

सोमवारीच पुन्हा व्यवहार

आजच्या शनिवारच्या सुटीनंतर उद्या (२७ नोव्हेंबर) रविवार असल्याने पुन्हा व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे उद्याही नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. आजच्या एटीएममध्ये कॅश होती. ती संपल्यानंतर उद्या व्यवहारांना पुन्हा मर्यादा येणार आहे. या दोन दिवसांचे खोळंबलेले व्यवहार सोमवारी सकाळी बँका सुरू झाल्यानंतर पुन्हा रुळावर होण्याची चिन्हे आहेत.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *