facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / Featured / ‘झोंबी’कार आनंद यादव यांचे निधन

‘झोंबी’कार आनंद यादव यांचे निधन

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – ‘झोंबी’तून ग्रामीण जीवनाचे अस्सल दर्शन घडविणारे आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही ते भूषविता न आलेले प्रसिद्ध लेखक, साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

डॉ. यादव यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी दुपारी १२.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता मेहता पब्लिशिंग हाऊस आणि त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे डॉ. आनंद यादव यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता.

डॉ. यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामधील कागलचा. आनंदा रत्नाप्पा जकाते हे त्यांचे मूळ नाव. अत्यंत गरीब कुटुंबातील यादव यांना शिक्षणासाठी घरून पाठिंबा नव्हता. त्यामुळे, यादव यांनी सुरुवातीचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या डॉ. यादव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून काम करण्याची संधी लाभली; तसेच, विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करण्याआधीपासूनच त्यांनी लेखन सुरू केले होते. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.

दुर्दैवी अध्यक्ष

महाबळेश्वर येथे २००९ मध्ये झालेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. यादव यांची निवड झाली होती. याच दरम्यान त्यांनी लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या त्यांच्या कादंबरीवरून वाद उद्भवला. या पुस्तकात संतश्रेष्ठ तुकारामांविषयी अनुचित मजकूर असल्याचा आरोप करत वारकरी संप्रदायाने डॉ. यादव यांना तीव्र विरोध केला. देहू येथे जाऊन डॉ. यादव यांनी पुस्तक मागे घेतल्याचे जाहीर केले होते. तरीही, त्यांना संमेलनात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारता आली नाहीत.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *