facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / महिला गुंतल्या अंगारे, धुपाऱ्यांत
aawaz-news-image

महिला गुंतल्या अंगारे, धुपाऱ्यांत

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळून कर्मकांडांचा निषेध केला. पण, आजही या देशातील महिला अंगारे, धुपारे, कर्मकांड, उपवास-तापास यांत गुंतल्या आहेत. यामुळे महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करायचे असल्यास त्यांना ब्राह्मणी प्रवृत्तीच्या कर्मकांडापासून मुक्त करायला हवे. कर्मकांड हाच महिला सक्षमीकरणात अडथळा आहे’, असे मत बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाताई मोराळे यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महिला महाअधिवेशन रविवारी काँग्रेसनगरातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाले. त्याच्या उद्घाटनीय भाषणात मोराळे यांनी धार्मिक विचार व त्यामुळे महिला सक्षमीकरणात येणारे अडथळे मांडत संघ परिवारावर प्रखर टीका केली. ‘ओबीसी समाजातील करंट्या नेत्यांमुळे हा समाज १९९० पर्यंत आरक्षणापासून वंचित राहिला. त्यानंतर १९९२ मध्ये ब्राह्मणी प्रवृत्तीच्या नरसिंहराव यांनी उदारीकरण, जागतिकीकरणाची कवाडे उघडली आणि आरक्षण मिळूनही ओबीसी व या समाजातील महिलांचे स्वातंत्र्य पुन्हा बंधनात आले. आता महिलांना राजकारणात आरक्षण आहे. पण, हे आरक्षण नाममात्र आहे. राजकारणाचा सारिपाट त्यांचे पतीच हाकतात. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग होत नाही तोपर्यंत सक्षमीकरण होणार नाही. याचा लढा ओबीसी महिलांना आता उभा करावा लागणार आहे’, असे मोराळे म्हणाल्या. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष वृंदा ठाकरे यांनीदेखील देव-धर्माच्या नावावर प्राचीन परंपरा महिलांवर थोपविल्या गेल्‍या असून, त्‍यातून ओबीसी महिलांचा विकास खुंटला असल्याचा विषय मांडला. पण, आजही बहुजन समाज हा व विशेषत: या समाजातील महिला जात आणि धर्मसंस्थेसमोर नतमस्तक होतानाच दिसतो, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे हे अध्यक्षस्थानी होते. ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्षा सुषमा भड यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनानंतरच्या सत्रांमध्ये संध्याताई सराटकर, अॅड. वैशाली डोळस, धम्मसंगिनी, सुषमा अंधारे, जयश्री शेळके, सुप्रिया बावनकुळे यांनी विविध विषय मांडले. यानंतर विविध विषयांवर मान्यवरांनी सांगोपांग चर्चा करीत काही धोरण ठरविली.

पंकजा मुंडे अनुपस्थित

या अधिवेशाला राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यादेखील उपस्थित राहणार होत्या. पण, काही कारणास्तव त्या आल्या नाहीत. तर भाजपच्या जि. प. अध्यक्ष निशा सावरकरदेखील अनुपस्थित होत्या. एकूणच संपूर्ण अधिवेशनभर ‘ब्राह्मणी प्रवृत्ती’ या विषयावर टीका करताना वक्ते वारंवार संघ परिवार व भाजपवरदेखील निशाणा साधत होते. त्‍यामुळेच कदाचित पंकजा मुंडे आल्या नाहीत, असे बोलले जाते. पण, भाजपचेच माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे हे मंचावर बसून होते.

‘मोदी हे बोगस ओबीसी’

सुशीलाताई मोराळे यांनी उद्‍घाटनीय भाषणात भाजपच्या धोरणांवर सडकून टीका केली. त्याचवेळी मोदी हे बोगस ओबीसी आहेत. केवळ मतांसाठी त्यांनी स्वत:ची जात तेली सांगितली. पण, वास्तवात ते गांची समाजाचे आहेत. गोबेल्स नीतीने ते वारंवार खोटे सांगून, खरे करून घेत आहेत, असे त्या म्हणाल्या.

मराठा टीकेवेळी खेडेकर मंचावर

मोराळे यांनी त्यांच्या भाषणात अॅट्रॉसिटी आणि आरक्षण या विषयावरून मराठा समाजाच खरपूस समाचार घेतला. ‘स्वत:ला मागास म्हणविण्याची लाज वाटते आणि आरक्षण मागतात व त्याचवेळी अॅट्रॉसिटीचा निषेध करता’, असे त्या म्हणाल्या आणि त्याचवेळी मराठा समाजातील नेते पुरुषोत्तम खेडेकर यांचे मंचावर स्वागत करण्यात आल्याचा विरोधाभास दिसून आला.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *