facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / शिक्षकांची बाजू मांडण्यात यश
aawaz-news-image

शिक्षकांची बाजू मांडण्यात यश

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – ‘कोणत्या लेखकाचे किंवा कोणत्या पुस्तकाचे वाचन केले, यावरून व्यक्तीची वैचारिक बैठक तयार होते. संघाच्या नियतकालिकेच्या माध्यमातून कोणताही अभिनिवेश न ठेवता सरकारच्या धोरणांवर आसूड ओढता येतो. शिक्षकांना सेल्फीमध्ये अडकून ठेवण्याचा सरकारने घाट घातला तेव्हा, नियतकालिकेत वस्तुनिष्ठ लिखाण करून शिक्षकांची बाजू मांडण्यात यश आले,’ असे मत प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर आरडे यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी व्ही. जी. पाटील होते.

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक कर्मचारी व शिक्षक संघाच्यावतीने जीवनगौरव व गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. जुना वाशीनाका येथील देशमुख सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, टी. डी. लाड यांना जीवनगौरव, तर एम. जे. पाटील व व्ही. एम. पाटील यांना गुणवंत कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आरडे म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर शिक्षणक्षेत्रात झालेल्या बदलांमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सक्षम बनण्याची गरज आहे. आज नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्वत:च्या नातेवाइकांना फायदा होण्याच्या दृष्टीने एखादी संस्था चालवली जात आहे. मात्र, गळदगे यांनी आपल्या माणसांविरोधात निर्भीडपणे काही गोष्टी नियतकालिकामध्ये मांडल्याने त्यांचे स्वागत करायला हवे.’

सत्काराला उत्तर देताना डॉ. चौसाळकर म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल झाले. त्यामुळे सर्वच संघटनांची जबाबदारी वाढली आहे. संघटनांना अनेक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागत आहे, या संघर्षावर मात करण्यासाठी मते मांडण्याचा आवश्यकता आहे. अशावेळी संघटनांचे मुखपत्र उपयोगी पडते.’

एम. जे. पाटील व व्ही. एम. पाटील यांनी पुरस्कारांची रक्कम संघटनेला परत केली. यावेळी जी. ए. पाटील, ए. एस. शिरगुप्पे, आर. एस. बरगे आदींसह जिल्हा माध्यममिक कर्मचारी व शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. एस. जी. तोडकर यांनी प्रास्ताविक केले. बी. आर. कदम यांनी सूत्रसंचालन केले. सर्जेराव पाटील यांनी आभार मानले.

Check Also

नव्या नेतृत्वाला मिळणार संधी

कोल्हापूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक गुरुवारी विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने संमत झाल्याने पुढील शैक्षणिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *