facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चा जनआक्रोश

काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चा जनआक्रोश

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी ‘जनआक्रोश’ व्यक्त केला. काँग्रेसने नोटाबंदीविरोधात मोर्चा काढला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील मुख्य चौकात निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला.
केंद्राच्या निर्णयाविरोधात सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत, शहर काँग्रेसने महात्मा फुले मंडई ते कॅम्पपर्यंत मोर्चा काढून जनसामान्यांमध्ये असलेला रोष व्यक्त केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वसामान्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश आंदोलन केले.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांना बँका आणि एटीएमबाहेर ताटकळत थांबावे लागत आहे. कोणतीही सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता नोटा रद्द करण्यात आल्याने शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. बाजारपेठा ठप्प झाल्या असून, दैनंदिन व्यवहारांवरही मोठा परिणाम झाला आहे, याकडे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी लक्ष वेधले. बागवे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, अभय छाजेड, कमल व्यवहारे यांच्यासह अनेक नगरसेवक-पदाधिकारी सहभागी झाले होते.
काळ्या पैशाला अंकुश घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असले, तरी नोटा मिळविण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. सरकारच्या नियोजनशून्यतेमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. नागरिकांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रोश आंदोलन केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. वंदना चव्हाण यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली टिळक चौकात झालेल्या आंदोलनात महापौर प्रशांत जगताप, सभागृहनेते बंडू केमसे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *