facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / पर्रीकर, बोलण्यापेक्षा कृती करा!

पर्रीकर, बोलण्यापेक्षा कृती करा!

आवाज न्यूज नेटवर्क –

मुंबई – गोवा विधानसभा निवडणुकीवर डोळा असलेल्या शिवसेनेने आता आपल्या टीकेची तोफ संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दिशेने वळवली आहे. पर्रीकर यांनी सध्या गोव्यात सभांचा धडाका लावला आहे. आपल्या भाषणांमधून ते दररोज पाकिस्तानला इशारे देत आहेत. त्यावरच बोट ठेवत ‘गोव्याच्या विधानसभा निवडणुका व पाकिस्तानचा प्रश्‍न वेगळा आहे हे पर्रीकरांना कुणीतरी सांगायला हवे’, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून पर्रीकर यांना ऐकवले आहे. ‘आम्हाला डिवचले तर दुश्मनांचे डोळे काढून हातात देऊ’, अशी गर्जना गोव्यातील एका सभेत पर्रीकर यांनी केली होती. त्याचा चांगलाच समाचार शिवसेनेने घेतला आहे. पाकिस्तान व चीनचे राहू द्या बाजूला, गोव्यातील अनेक भागांचे जे अराष्ट्रीयीकरण सुरू आहे त्यावर संरक्षणमंत्र्यांनी बोलायला हवे, असा टोला शिवसेनेने लगावलाय.

उद्धव काय म्हणाले?

– देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे पण जास्तीत जास्त कृती शांतपणे करावी, असे संकेत आहेत. पण पाकिस्तानच्या बाबतीत राजकीय सभांतून बोलले की, टाळ्यांचा गजर होतो. लोकसभा निवडणूक काळातील नरेंद्र मोदी यांची भाषणे पाहिली की हे लक्षात येईल. मोदी यांच्या पारड्यात लोकांनी भरभरून मतदान टाकले ते पाकला धडा शिकवतील, इतकेच नव्हे तर पाकिस्तानचे नामोनिशान मिटवतील याच गर्जनांच्या प्रेमात पडून!

– उरी हल्ल्याचा बदला आपण सर्जिकल स्ट्राइक करून घेतला, पण पाकचे डोळे त्यामुळे उघडलेले नाहीत. आजही त्यांचे भयंकर हल्ले सुरूच आहेत. पाकचे डोळे काढून खरोखरच हातात दिले असते तर आमचे जवान रोज जखमी किंवा शहीद झाले नसते.

– रशियन व नायजेरियन टोळ्यांनी गोव्यातील अनेक भागांचे स्वातंत्र्य व शांतता, कायदा आणि सुव्यवस्था विकत घेतली आहे. स्त्रियांची इज्जत व गोमंतकीय नागरिकांची सुरक्षा धोक्यात आहे. गोव्याचे पोलीसही रशियन-नायजेरियन टोळ्यांपुढे नांगी टाकतात. आधी या टोळ्यांचे डोळे काढून हातात द्या, मग पाकचे बोला, असे कुणी गोवेकराने जाहीर सभेत उठून सुनावले तर पर्रीकरांकडे काय उत्तर आहे?

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *