facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / भाजप आघाडीचा दमदार प्रवेश

भाजप आघाडीचा दमदार प्रवेश

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – आव्हाने-प्रतिआव्हानांमुळे प्रचंड राजकीय इर्षेने लढल्या गेलेल्या जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमधील अटीतटीच्या लढतींमध्ये मुरगूडमध्ये शिवसेनेने, मलकापूरमध्ये भाजप आघाडीने तर पेठ वडगावमध्ये युवक क्रांती आघाडीने सत्तांतर घडवले. भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहभागामुळे चुरशीच्या बनलेल्या व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल नगरपालिकेतील लढतीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी वर्चस्व कायम ठेवत सत्ता मिळवली. मात्र प्रथमच उतरलेल्या भाजपने राष्ट्रवादीला चांगलेच झगडायला लावले. गडहिंग्लजमध्ये जनता दल, कुरुंदवाडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीने तर पन्हाळ्यात जनसुराज्यने सत्ता कायम ठेवली. इचलकरंजी, जयसिंगपूरमध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आली असली तरी नगराध्यक्षपद मात्र भाजप आघाडीला मिळाले. त्यामुळे पुढील पाच वर्षे येथील राजकारण अखंड धगधगत राहण्याची चिन्हे आहेत. नगरपालिकांच्या माध्यमातून भाजप आघाडीने जिल्ह्याच्या राजकारणात दमदार प्रवेश केला आहे.

रविवारी झालेल्या ७९.३९ टक्के मतदानानंतर सोमवारी सकाळपासून त्या त्या नगरपालिकांच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रचंड उत्सुकता, क्षणाक्षणाला चित्र बदलणारे निकाल, नगराध्यक्षपद व सत्ता यांचे सतत वरखाली होत असलेल्या पारड्यांमुळे कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांनाही सहन करावा लागलेला आशा-निराशेचा खेळ अशा वातावरणात मतमोजणी पूर्ण झाली. सर्वांत पहिला निकाल पन्हाळा नगरपालिकेचा जाहीर झाला. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालिकांमधील नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाले. निकाल समजताच त्या त्या प्रभागांमधील उमेदवार व समर्थक गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करत होते. सत्तांतर झालेल्या नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवलेल्या पक्ष, आघाड्यांकडून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचे जयराम पाटील विजयी झाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. त्यानंतरही पाटील यांचाच विजय घोषित करण्यात आला. इचलकरंजीची मतमोजणी रात्री सर्वांत उशिरापर्यंत चालली.

 सकाळी केंद्र व राज्यात सत्ता मिळवल्यानंतर भाजप व शिवसेना प्रथमच ग्रामीण पातळीवरील सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जात होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, जनता दल स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून सत्तेत होते. भाजपने ठिकठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या करुन या निवडणुकांत पर्याय उभा केला होता. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात चांगलेच दंड थोपटले होते. त्यासाठी समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपप्रवेशही झाला होता. मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपने लावलेल्या ताकदीमुळे येथे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने स्थानिक घाटगे गटाला सोबत घेत लावलेल्या ताकदीमुळे ९ जागा मिळवल्या. राष्ट्रवादीलाही ९ जागा मिळाल्या. शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र असल्याने ११ विरुद्ध भाजप ९ असे बलाबल झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडीतही राष्ट्रवादीच्या माणिक माळी विजयी झाल्या. या बलाबलामुळे मुश्रीफ यांनी सत्ता कायम राखली असली तरी भाजपने कडवी झुंज दिली.

कागलबरोबरच मुरगूडकडेही अनेकांचे लक्ष लागले होते. पाटील गटाच्या ताब्यात असलेल्या मुरगूड पालिकेवर शिवसेनेने भगवा फडकवला. नगराध्यक्षपदावरही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सेनेला १२, पाटील गटाला २, अपक्षांना २ तर शिवाजी आघाडीला १ जागा मिळाल्या. मलकापूरमध्ये भाजप-जनसुराज्यने सत्तांतर घडवले. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचा निसटता पराभव करत सत्ता मिळवली. तसेच नगराध्यक्षपदावरही विजय मिळवला. भाजप आघाडीला ९ तर सेना, राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या. पेठ वडगाव पालिकेत मात्र अनपेक्षितरित्या युवक क्रांती आघाडीने बाजी मारली. सत्ताधारी यादव आघाडीचा पराभव करत युवक क्रांती आघाडीने १३ जागा मिळवल्या. विविध पक्षांनी पाठींबा दिलेल्या या आघाडीचे मोहनलाल माळी नगराध्यक्षपदी विराजमान झाले. यादव आघाडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. कुरुंदवाडमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीची सत्ता कायम राखली असली तरी तिथे काँग्रेसचे जयराम पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाले. काँग्रेस व राष्ट्रवादीला ११ तर भाजप आघाडीला ६ जागा मिळाल्या.

गडहिंग्लजमध्ये जनता दलाने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. जनता दलाच्या स्वाती कोरी नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. जनता दलाला १० जागा, राष्ट्रवादीला ४, भाजपला २ तर शिवसेनेला १ जागा मिळाल्या. पन्हाळ्याचा गड माजी आमदार विनय कोरे यांनी राखला. भाजपच्या सोबतीने उतरलेल्या जनसुराज्य आघाडीचे १२, भोसले गटाचे २ तर शाहू आघाडीचे ३ उमेदवार विजयी झाले. जनसुराज्य आघाडीच्या रुपाली धडेल या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.

नगराध्यक्ष एकाचे सत्ता दुसऱ्यांची

जयसिंगपूर व इचलकरंजी नगरपालिकेत कुरघोड्याच्या राजकारणाला ऊत येणार आहे. जयसिंगपूरमध्ये सत्ताधारी शाहू आघाडीने सत्ता कायम राखत १३ जागा मिळवल्या. पण त्यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. तिथे ताराराणी आघाडीच्या डॉ. निता माने नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. इचलकरंजीत नगराध्यक्षपदी भाजपच्या अलका स्वामी विजयी झाल्या. तर काँग्रेस व मित्र पक्षांची सत्ता आली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी सत्ता एकाची व नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे असे चित्र तयार झाले आहे. यामुळे दोन्ही गट एकमेकांना शह काटशहाचे राजकारण खेळणार हे स्पष्ट आहे.

०००००००००००००००००००

स्वतंत्र चौकट

कोण कुठे सत्तेवर?

कागल – राष्ट्रवादी

गडहिंग्लज-जनता दल

पन्हाळा- जनसुराज्य पक्ष

कुरुंदवाड – काँग्रेस आघाडी

मुरगूड- शिवसेना

मलकापूर- भाजप- जनसुराज्य आघाडी

पेठवडगाव- युवक क्रांती आघाडी

इचलकरंजी- काँग्रेस मित्रपक्ष (नगराध्यक्ष भाजप आघाडी)

जयसिंगपूर- शाहू आघाडी (नगराध्यक्ष ताराराणी आघाडी)

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *