facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / विखे, कोल्हे, ससाणे यांचे गड कोसळले
news-19

विखे, कोल्हे, ससाणे यांचे गड कोसळले

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगर जिल्ह्यातील आठ ८ पालिकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, या निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना मोठा दणका बसला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मात्र गड राखला. कोपरगावात भाजपचे बंडखोर विजय वहाडणे यांनी प्रस्थापितांना पराभूत केले. राहता, देवळाली प्रवरा, पाथर्डी या तीन पालिका भाजपने जिंकल्या. संगमनेर, शिर्डी काँग्रेसने, तर श्रीरामपूरची पालिका राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप आघाडीने जिंकली.

संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी या नगरपालिकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. शिर्डी विधानसभा मतदारसंघ या विखे यांच्या बालेकिल्यात कमळ उमलले. तालुक्याचे केंद्र असलेल्या राहता पालिकेतील विखे यांची सत्ता भाजपचे राजेंद्र पिपाडा यांनी उलथवून टाकली. नगरसेवक निवडणुकीतही भाजप शिवसेना, रासप महाआघाडीने ९ जागा पटकावल्या. शिर्डीत मात्र शिवसेना-भाजप यांची सत्ता गेली. विखे यांच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १७ पैकी १० जागा जिंकल्या.

कोपरगावात माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई आणि भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निष्ठावान भाजप कार्यकर्त्याला डावलून जवळच्या नातेवाइकास नगराध्यक्षपदासाठी उभे केल्याचा फटका सोसावा लागला. तिकीट नाकारल्याने बंडखोरी केलेले माजी खासदार सूर्यभान वहाडणे यांचे चिरंजीव विजय वहाडणे यांनी भाजपचे पराग संधान यांचा पराभव केला. आमदार स्नेहलता कोल्हे व बिपीन कोहे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कोल्हे यांच्या विरोधात उसळलेल्या नकारात्मक मतांची लाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेऊनही ती ओसरली नाही.

ससाणे यांची हार

दीर्घकाळ पालिकेची सत्ता सांभाळणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनाही धक्का बसला. काँग्रेसचे ३२ पैकी २२ नगरसेवक जिंकून आले असले तरी नगराध्यक्षपदासाठी राजश्री ससाणे निवडणूक हारल्या. भाजपबरोबर युती करून गोविंदराव आदिक यांची कन्या अनुराधा आदिक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. तरुण महिला नगराध्यक्ष झाल्या आहेत.

भाजपची मुसंडी

भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी देवळाली प्रवरा पालिका जिंकली. भाजपचे सत्यजित कदम नगराध्यक्षपदी निवडून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. १८ पैकी १६ नगर सेवकांच्या जागाही भाजपने जिंकून एकहाती सत्ता आणली. पाथर्डीत भाजपच्या आमदार मोनिका राजळे व माजी आमदार राजीव राजळे यांनी पालिका जिंकून आणली. भाजपचे डॉ. मृत्यंजय गर्जे निवडून आले.

गड मजबूत

काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर पालिकेची, तर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राहुरी पालिकेची सत्ता पुन्हा खेचून आणली. संगमनेरात एकतर्फी विजय मिळविताना थोरातांच्या भगिनी दुर्गा तांबे यांना तिसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळाले आहे. काँग्रेसचे विखे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांन युती करून तनपुरे यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी मोठी ताकद लावली. तरीही प्रसाद यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे विजयी झाले.

पक्षीय बलाबल

भाजप ः राहाता, देवळाली प्रवरा, पाथर्डी
काँग्रेस ः संगमनेर, शिर्डी
राष्ट्रवादी-भाजप युती ः श्रीरामपूर
जनसेवा मंडळ ः राहुरी
भाजप बंडखोर ः कोपरगाव

Check Also

news-1

नियमितीकरणासाठी फक्त एक रुपया

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – नगर शहरात खासगी व सरकारी खुल्या जागांवर असलेल्या सर्वधर्मिय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *