facebook
Sunday , December 11 2016
Home / Featured / विखे-थोरात यांचे आरोप-प्रत्यारोप
news-18

विखे-थोरात यांचे आरोप-प्रत्यारोप

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – नगर जिल्ह्याच्या राजकारणात राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात या काँग्रेसमधील दोन दिग्गजांमध्ये राजकीय साठमारीतून सतत वाद होत असतात. नगरपालिका निवडणुकीवरून या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. विरोधी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसल्याने काय होते याची फळे विरोधी पक्षनेत्याला पालिका निवडणुकीत मिळाली आहेत. विखे यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यात भाजपशी उघडपणे हातमिळवणी केली. ज्यांच्याकडे पक्ष वाढविण्याची जबाबदारी आहे तेच काँग्रेसच्या विरोधी काम करतात हे पक्षासाठी घातक आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या आरोपाचे खंडन करताना राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांना टीकेचे लक्ष बनविले. विखे म्हणाले, काँग्रेस पक्षाच्‍या माध्‍यमातून मोठमोठी पदे भोगल्‍यानंतर‍ही नगरपालिकेच्‍या निवडणुकीच्‍या निमित्‍ताने ज्‍यांना जिल्‍ह्यात आणि जिल्‍ह्याबाहेर जाता आले नाही, त्‍यांना कोणती काँग्रेस अभिप्रेत आहे. कुटीलनीतीचा आरोप करणाऱ्यांच्‍या मनात कटूता किती आहे, यांच्‍याही निष्‍ठा आता तपासण्‍याची वेळी आली आहे. संगमनेर शहरामध्‍ये जनाधार कमी होत चालल्‍याचे खापर आमच्‍या माथी का फोडता? असा खोचक सवाल विखे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना केला. शकुंतला थोरात या महिला काँग्रेस उमेदवाराच्‍या विरोधात बंडखोरी करून विधानसभेत निवडून आलेल्‍यांनी आता स्‍वतःच्‍याच पक्ष निष्‍ठा तपासण्‍याची खरी गरज आहे. कुटीलनीतीचा वापर करून संगमनेरच्‍या निवडणुकीत कोणी किती पैशांचा वापर केला हे तेथील जनता जाणून आहे, अशी टीका विखे यांनी केली.

माझ्या शिर्डी मतदारसंघाला जोडलेल्या संगमनेर तालुक्यातील गावात थोरातांचे कार्यकर्ते शिवसेनेचे झेंडे आणि फलक लावून माझ्या विरोधात काम करत होते. या घटना आम्ही विसरलेलो नाही. नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी थोरात राज्यात फिरकले नाहीच; पण जिल्ह्यात गेले नाहीत. मी मात्र जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी, तेथील उमेदवारांना ताकद देण्यासाठी सतत प्रयत्नशील होतो, त्यांच्यासाठी प्रचारसभाही घेतल्या. थोरातांनी काँग्रेस वाढीसाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान विखे यांनी थोरात यांना दिले. जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विखे-थोरात या दिग्गज नेत्यांमधील सुरू झालेले हे भांडण आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Check Also

news-4

आजपासून एसटीत जुन्या नोटा बंद

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – एसटी प्रवासात प्रवाशांकडून जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणे बंद करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *