facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / आणखी दहा मंदिरे वगळणार

आणखी दहा मंदिरे वगळणार

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध मनपा प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईतून आणखी दहा मंदिरे वगळली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संबंधित मंदिरांबाबतचे पुरावे आज मंगळवारी (२९ नोव्हेंबर) मनपात झालेल्या सुनावणीच्यावेळी भाविकांकडून दिले गेल्याने व त्यात तथ्य असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाल्याने ही मंदिरे कारवाईतून वगळली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र, त्याबाबत अधिकृत निर्णय उद्या बुधवारी (३० नोव्हेंबर) होणाऱ्या मनपास्तरीय बैठकीत घेतला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

नगर शहरातील २६ मंदिरांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने २००९नंतरच्या धार्मिक स्थळांवर होत असलेल्या या कारवाईमुळे शहरभर काहीसे अस्वस्थतेचे वातावरण आहे. ज्या २६ मंदिरांवरील कारवाई चर्चेत आहे, त्यांच्या यादीत एका मंदिराचे नाव दोनदा आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईच्या रडारवर २५ मंदिरेच आहेत. यापैकी दोन मंदिरांबाबत संबंधितांनी पुरावे दिल्याने ती आधीच वगळली गेली आहेत. राहिलेल्या २३ मंदिरांबाबत रोज मनपावर भाविकांचे मोर्चे येत आहेत. काल सोमवारी मनपाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मंदिरांचे फेरसर्वेक्षण केले. त्यानंतर आज मनपामध्ये जाहीर सुनावणी घेतली गेली. यावेळी या मंदिरांच्या परिसरातील नगरसेवक व भाविकांनी आवश्यक पुरावे दाखल केले. यापैकी १० मंदिरे २००९पूर्वीची असल्याचे पुरावे दिले गेल्याने ती अंतिम कारवाईतून वगळली जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्याचा निर्णय आज मनपास्तरीय बैठकीत अंतिम केला जाणार आहे. दरम्यान, नगर शहरातील सर्वधर्मीय १०५ धार्मिक स्थळे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यांची यादी मनपाने राज्य सरकार व उच्च न्यायालयास पाठवली आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे समजते.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *