facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / ‘बहुजन विकास शिक्षणातूनच शक्य’

‘बहुजन विकास शिक्षणातूनच शक्य’

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – ‘महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाचा विकास खुंटला आहे. त्याला मनूवादी धर्मव्यवस्था कारणीभूत आहे. या व्यवस्थेविरोधात लढताना चांगल्या शिक्षणाबरोबरच समग्र साहित्याचे वाचनही आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे क्रांतिबा जोतिराव फुले यांचा स्मृतिदिन तसेच बहुजन शिक्षक दिनानिमित्त सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक संघ, बहुजन ऐक्य चळवळ, सम्यक मुव्हमेंट, पंचगंगा खोरे बहुजन युवा शक्तीच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी लेखिका प्रा. डॉ. सिंधुताई आवळे होत्या.

‘क्रांतिबा जोतिराव फुले आणि आजचे समाजवास्तव’ या विषयावर माने यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘बहुजन समाजाच्या विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर शिक्षक व प्राध्यापकांनी समग्र वाड्मय वाचले पाहिजे. आजच्या पिढीत वाचनाचा अभाव दिसतो. जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेबांनी शिक्षणाबाबत पायाभूत सुविधा निर्माण केल्या. मात्र मनूवादी शिक्षण पद्धतीमुळे आपले विचार, जीवनशैलीवर प्रभाव टाकला असून जोपर्यंत आपल्या डोक्यातून मनूवादाचे विसर्जन होत नाही, तोपर्यंत बहुजनांचा विकास होणार नाही.’

प्रा. डॉ. आवळे म्हणाल्या, ‘आज दीडशे वर्षे झाले तरीही महिलांवर होणारे अत्याचार, दलितांवरील अन्याय कमी झालेले नाहीत. संघटनेच्या वतीने दलितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.’

माने यांच्या हस्ते महावीर कॉलेजचे प्रा.डॉ. शरद गायकवाड व एस. के. पाटील कॉलेजच्या प्रा. शैलजा शिंदे यांना सत्यशोधक पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि परिवर्तनवादी चळवळीची पाच हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरुप होते.

डॉ. गायकवाड व प्रा. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल म्हमाने यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी आभार मानले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *