facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / Featured / ‘सवाई’त लघुपटांची पर्वणी

‘सवाई’त लघुपटांची पर्वणी

आवाज न्यूज नेटवर्क –

पुणे – चौसष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात ‘षड्ज’ या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर ‘अंतरंग’ या कार्यक्रमातून महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या काही कलाकारांशी संवादही साधता येणार आहे. येत्या ७ ते ९ डिसेंबर दरम्यान सवाई गंधर्व स्मारकामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवंगत गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची यंदा जन्मशताब्दी. या पार्श्वभूमीवर ‘षड्ज’चा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. ७ डिसेंबर रोजी या वेळेत व्ही. राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला सुब्बलक्ष्मी यांच्या वरील माहितीपट दाखविण्यात येईल. त्यानंतर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्यावरील डॉ. के. प्रभाकर यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट पाहता येईल. ८ डिसेंबर रोजी ‘अंतरंग’मध्ये सूरबहार वादक उस्ताद इर्शाद खान आणि किराणा घराण्याचे गायक गणपती भट यांची मुलाखत रंगणार आहे. ९ डिसेंबर रोजी ‘षड्ज’ अंतर्गत फिरोज चिनॉय दिग्दर्शित डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावर आधारित माहितीपट दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर बासरीवादक बहिणी देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम रंगणार आहे. या दोघी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शिष्या आहेत. वरील सर्व कार्यक्रम सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान आयोजिण्यात आले आहेत. अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सतीश पाकणीकर उपस्थित होते.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पहिला दिवस (बुधवार, ७ डिसेंबर) उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना, चौथा दिवस (शनिवार, १० डिसेंबर) एम. एस सुब्बालक्ष्मी यांना समर्पित करण्यात येईल, असेही जोशी म्हणाले. यंदाच्या महोत्वासाठी पीएमपीच्या सहकार्याने रमणबाग-कात्रज, रमणबाग-सिंहगड रस्त्यामार्गे धायरी, रमणबाग-कोथरूड आणि रमणबाग-कर्वेनगर अशा चार मार्गांवर विशेष बससेवा देण्यात येणार आहे.

गुंदेचा बंधूंना जोशी पुरस्कार
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दर वर्षी ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार प्रसिद्ध धृपद गायक पं. उमाकांत गुंदेचा आणि रमाकांत गुंदेचा या बंधूंना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. रुपये ५१ हजार, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७ डिसेंबरला हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. गुंदेचा बंधू ज्येष्ठ धृपद गायक फरिदुद्दिन डागर आणि झिया मोइनुद्दीन डागर यांचे शिष्य आहेत.

यंदा उलगडणार तबकडी युग
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त यंदाही प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर प्रदर्शन लावणार आहेत. ‘तबकडी युग’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, ग्रामोफोन रेकॉर्डच्या सुवर्णकाळातील तसेच, जाणकार संगीत रसिकांनी जतन करून ठेवलेल्या निवडक रेकॉर्डच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठांच्या छायाचित्रांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात येणार आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *