facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Featured / हिंगणघाट, वणीत आक्रोश

हिंगणघाट, वणीत आक्रोश

आवाज न्यूज नेटवर्क –

नागपूर – नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी सदोष पद्धतीने झाली आहे. त्यामुळे फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी करीत हिंगणघाट आणि वणी येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये घोळ करून निकाल घोषित केल्याचा आरोप करीत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट काँग्रेसने आक्षेप नोंदविला. यावरून बल्लारपुरात तणावाचे वातावरण होते.

हिंगणघाटात नेते रस्त्यावर
वर्धा : हिंगणघाट येथील नगरपालिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतमोजणी सदोष असल्याने फेरमतदान घ्यावे, अशी मागणी करीत मंगळवारी हिंगणघाट येथे सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान, पोलिसांकडे उपलब्ध फुटेजवरून वर्धा पोलिसांनी काही कार्यकर्त्यांसह किसान अधिकार अभियानाचे अविनाश काकडे यांना ताब्यात घेतले.
हिंगणघाट येथे मतमोजणीदरम्यान मत वाढल्याचे दिसून आले होते. वर्ध्यातही हाच प्रकार दिसून आल्याने विरोधकांनी यावर आक्षेप नोंदविला होता. याविरोधात मागण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. निवेदन देत आक्षेपही नोंदविला. त्यानंतर गोंधळ उडाल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. सोमवारच्या या गोंधळानंतर मंगळवारी सर्वपक्षीय नेते एकत्र आले. भाजपचा तेवढाच अपवाद होता. हिंगणाघाटत रस्त्यावर आलेल्या या संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा मतदान घावे, ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापराव्यात आदी मागण्या केल्या. सोबतच मतमोजणीची प्रक्रिया सदोष असल्याने ती रद्द करण्यावरही जोर देण्यात आला. ‘मतमोजणीच्यावेळी काही लोकांनी आक्षेप घेतला होता. पण, अधिकाऱ्यांनी काहीही ऐकून घेतले नाही. ब्रिटिशराज असल्याचीच परिस्थिती दिसून येत होती. म्हणूनच हा आक्रोश व्यक्त झाला,’ असे मत अशोक शिंदे यांनी व्यक्त केले. निवेदन देणाऱ्यांत माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे, माजी आमदार राष्ट्रवादीचे नेते राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष व उमेदवार सुधीर कोठारी, काँग्रेसचे पांढरी कापसे, गिरीधर राठी, बसपचे पीर महमंद, रफिक शेख आदी नेते सहभागी झाले होते.

फेरमतदानासाठी वणीत मोर्चा

यवतमाळ : वणी नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपचे तारेंद्र बोर्डे मोठ्या फरकाने निवडून आले. प्रभागमध्ये २६पैकी २२ जागा भाजप तर चार अपक्ष निवडून आले. ही निवडणूक सर्वच पक्षांनी अटीतटीने लढविली होती. त्यामुळे भाजपच्या एकतर्फी विजयाने ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचा आरोप भाजपवगळता काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या नेत्यांनी केला आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाने याची करावी, फेरमतदान घ्यावे यासाठी मोर्चा काढण्यात आला.
सोमवारी नगर परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजपमध्ये जल्लोष तर इतर पक्षांत खळबळ उडाली. साऱ्यांनीच ही निवडणूक अटीतटीची लढविली होती. सर्वच पक्षाचा प्रचार जोरदार होता. त्यामुळे भाजपचा एकतर्फी विजय पाहता मोठी गडबड झाल्याची चर्चा सुरू झाली. रात्री संतप्त नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वणीचे उपविभागीय अधिकारी शिवानंदन मिश्रा यांना घेराव घातला. ईव्हीएममध्ये बिघाड असल्याचा आरोप केला. मतमोजणी व्यवस्थित न झाल्याचाही आरोप नेत्यांचा होता. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्व नेत्यांना बाहेर काढले. आपली तक्रार लेखी द्या असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या संतप्त नेत्यांना सांगितले. रात्री शहरात त्यामुळे तणावाची स्थिती होती. आजही शहरातील दुकाने बंद होती. भाजपचा एकतर्फी विजय व तोदेखील मोठ्या फरकाने हे आश्चर्यचकित करणारे आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी व फेरमतदान घ्यावे, अशी मागणी सेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केली आहे. यवतमाळमध्ये या मतमोजणीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रभागमध्ये पराभूत झालेल्या उमेदवार माधुरी अराठे यांनी केला आहे. आपल्या प्रभागात सर्वाधिक पाठिंबा आपल्याला होता. पण, तरीही आपला क्रमांक तिसरा राहिला. फेर मतमोजणीची केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आता हायकोर्टात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चात सेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, मनसेचे राजू उंबरकर, राष्ट्रवादीचे संजय देरकर, काँग्रेसचे पाथ्रटकर यांच्यासह बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.

निकालावरून आरोप-प्रत्यारोप

चंद्रपूर : बल्लारपूर नगर परिषद निवडणुकीत मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये घोळ करून निकाल घोषित केल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू झोडे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. या गडबडीची एका तज्ज्ञ इंजिनीअरमार्फत तपासणी करून नगराध्यक्षपदाची फेरनिवडणूक घेण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सोमवारी याबाबतची तक्रार केल्यानंतर बल्लारपुरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
बल्लारपूर नगर परिषदेतील मतमोजणीच्या वेळी प्रभागातील उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणी सभागृहात येण्यापूर्वीच ईव्हीएमचे सील फोडून मतमोजणी करण्यात आली. निकालही घोषित केला. त्यामुळे काही प्रभागातील ईव्हीएममध्ये घोळ झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर निवडणुकीत सरकारी यंत्रणा कामाला लावून राज्य शासनाने बल्लारपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये घोळ करून भाजपच्या बाजूने कौल वळविल्याचाही आरोपही राजू झोडे यांनी केला. सोमवारी यासंदर्भात बल्लारपूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. उमेदवारांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत काही बसेसचे नुकसान केल्याने दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले होते. रात्री पोलिसांना जमावास पांगविण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला होता.
आरोप नैराश्यातून : शर्मा
राजू झोडे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. निवडणुकीतील पराभव पचवता न आल्याने त्यांनी भाजप नेत्यांवर बेछुट व निराधार आरोप करणे सुरू केले आहे, असे प्रत्युत्तर बल्लारपूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिश शर्मा यांनी दिले आहे. ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप पत्रपरिषदेत करण्यापेक्षा त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी तक्रार करावी, असेही हरीश शर्मा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह दहांवर दंगलीचे गुन्हे

अकोला : नगरपालिका निवडणुकीमध्ये भारिप बमसंचे काम केल्याचा आरोप करीत मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायतउल्ला खाँ बरकत उल्ला खाँ पटेल यांच्यासह दहा जणांवर दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मोहाळा येथे निकालानंतर सोमवारी रात्री दहा वाजता घडली होती.
अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. या पराभवास भारिप बमसंचा उमेदवार कारणीभूत ठरला असा आरोप होत आहे. यातूनच ही घटना घडल्याचेही सांगण्यात येत आहे. अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये भारिप बमसंने सै. शरीफ राणा यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी मुस्लीम समाजाचे मतदान लक्षात घेऊन रामचंद्र बरेठिया यांना उमेदवारी दिली होती. बरेठिया यांची उमेदवारी पटेल यांनी प्रतिष्ठेची केली होती. निवडून आणण्याची हमी त्यांनी वरिष्ठांना दिली होती. मात्र राणा यांच्या उमेदवारीने काँग्रेसचे गणित बिघडले. पटेल यांच्या गावातच सुरुंग लागला. गावातील गाजी मोहम्मद खा, युसुफ खाँ पटेल यांनी राणा यांचा प्रचार केला. यावरून गाजी पटेल यांच्या मोहाला गावातील किराणा दुकानावर आठ ते दहा लोकांनी हातात काठ्या, तलवारी घेऊन हल्ला चढविला. दुकानातील मालाची फेकाफेक केली. तसेच दुकानावर असलेल्या एकास मारहाण करून त्यांच्या कारची तोडफोड केली, अशी तक्रार पटेल यांनी पोलिसात दिली आहे. त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नावाचाही उल्लेख तक्रारीत केला आहे. गाजी पटेल यांना मारहाण झाल्याचे समजताच अकोट येथून काही युवक मोहाळा येथे जात होते. यातील नादीर जमादार, जागीर जमादार यांनाही मारहाण करण्यात आली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *