facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / खंडोबाची पालखी मिरवणूक
news-17

खंडोबाची पालखी मिरवणूक

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवानिमित्त खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी दर्शसाठी गर्दी केली होती.

श्री खंडोबा स्वयंभू मूर्तीला गंगास्नान घातल्यानंतर अभिषेक, पूजा महाआरती करण्यात येऊन भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी दोन वाजता खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिरातून टाक्याचा दरा येथे गंगास्नान घालण्यासाठी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या नादात सदानंदाचा येळकोट, जय मल्हार च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. लंगर तोडल्यावर भाविकांनी पालखीवर भंडारा खोबऱ्याची उधळण केली.

पालखी मिरवणूक टाक्याचा दरा येथे आल्यावर उत्सवमूर्तीचे पंचामृताने ब्रह्म वृंदाच्या मंत्र घोषात पूजन करण्यात आले व गंगास्नान घालण्यात आले. त्याच वेळी भाविकांनी आपल्या घरातील टाक स्वरूपातील देवांनाही गंगास्नान घातले व देवाची भेट घडवली. या वेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त सुरेश सुपेकर आदी उपस्थित होते.

यानंतर सामूहिक तळी भांडार झाला. महाआरतीनंतर मिरवणूक परत मंदिरात आली. भाविकांनी आमटी भाकरीचा महाप्रसाद घेतला. जय मल्हार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले. देवस्थान समितीकडून भाविकांना पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था, वाहनतळ यासह इतर सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *