facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ‘ग्रामीण जाणिवेचा अस्सल लेखक’
news-12

‘ग्रामीण जाणिवेचा अस्सल लेखक’

आवाज न्यूज नेटवर्क –

औरंगाबाद – ‘बहुविध स्वरूपाचे लेखन करून साहित्यिक प्रा. आनंद यादव यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. केवळ लेखन करून ते थांबले नाही, तर ग्रामीण साहित्याची चळवळीद्वारे संमेलने घेतली. यादव यांचे अजोड योगदान नेहमी स्मरणात राहील,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी केले. मराठवाडा साहित्य परिषदेत मंगळवारी झालेल्या शोकसभेत ते बोलत होते.
‘झोंबी’, ‘नटरंग’, ‘गोतावळा’, ‘नांगरणी’ अशा दर्जेदार साहित्यकृतींचे लेखक आनंद यादव यांचे रविवारी निधन झाले. या उमद्या लेखकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मसापने शोकसभा घेतली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील व कार्यवाह डॉ. दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘यादव यांच्या साहित्यात कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन असे बहुविध लेखन आहे. इतर ग्रामीण लेखकांप्रमाणे त्यांनी विनोदी लेखन न करता लेखनात वेगळेपण जपले. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले होते, मात्र ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीवर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला. हा वाद सामंजस्याने मिटणे आवश्यक होते. प्रत्यक्षात यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. ही कटू आठवण ठरली’ असे बोराडे म्हणाले.
‘प्रा. आनंद यादव यांनी ग्रामीण तरुणांना लिहिते केले. ग्रामीण साहित्याची चळवळ राबवली. या चळवळीत रा. रं. बोराडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, भास्कर चंदनशिव जोडले गेले. १९७६ मध्ये माझ्या पहिल्या कथासंग्रहाचे यादव यांनी प्रकाशन केले होते. ‘स्पर्शकमळे’सारख्या पुस्तकाद्वारे त्यांनी वेगळ्या लेखनाचा आदर्श घातला,’ अशी आठवण डॉ. दादा गोरे यांनी सांगितली. शोकप्रस्तावाचे ठाले-पाटील यांनी वाचन केल्यानंतर यादव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रा. बाळासाहेब बोरसे, प्रा. विष्णू सुरासे, सुनील उबाळे, प्रा. जिजा शिंदे, प्रा. जयराम खेडेकर, संदीप भदाणे आदी उपस्थित होते.

महामंडळ पाठीशी होते…

‘महाबळेश्वर येथील ८३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा यादव यांनी राजीनामा दिला होता. ‘संतसूर्य तुकाराम’ कादंबरीमुळे वारकरी आक्रमक असूनही साहित्य महामंडळ यादव यांच्या पाठिशी होते. मात्र, कराड येथून कुणीतरी यादव यांना धमकीचा फोन केल्यानंतर त्यांची मुलगी घाबरली. डॉ. वि. भा. देशपांडे आणि आम्ही विनवणी करूनही यादव राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. गैरसमज व दुराग्रहातून संमेलनाचा कटू इतिहास निर्माण झाला,’ असे ठाले-पाटील म्हणाले.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *