facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / बोटा गावचा वीजप्रश्न मार्गी
news-19

बोटा गावचा वीजप्रश्न मार्गी

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – मागील १० वर्षांपासून प्रलंबित असलेला बोटा येथील सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे ३३ केव्ही क्षमतेचे वीज केंद्र मार्गी लावले तसेच त्यासाठी ४.५ कोटींचा निधी वर्ग करून निविदा काढून ते काम साई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला दिल्याने १५ गावांना व वाड्या वस्त्यांवर पूर्ण दाबाने वीज मिळणार असून शेतकऱ्यांच्या शेतावरील वीजपंपही पूर्ण दाबाने चालणार असल्याने बोटा व परिसरातील जनतेने जल्लोष केला.

याबाबत समजलेली माहिती अशी, बोटा व परिसरातील १५ गावांना घारगाव येथील वीज केंद्रावरून वीजपुरवठा होतो, त्यामुळे कमी दाबाने वीज मिळत असल्याने, बोटा, आंबी दुमाला, अकलापूर, तळपेवाडी, कुरकुटवाडी, भोजदरी, म्हसवंडी, केलेवाडी, माळवाडी, आभाळवाडी, मुठेवाडी, येळखोप, ठाकरवाडी, बदगी आदी १५ गावे व वाड्यावस्त्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नव्हती. त्यामुळे सरपंच विकास शेळके यांनी सरपंचपद मिळाल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून ३३ केव्ही सब स्टेशनचा प्रस्ताव ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासमोर नेऊन त्यास मंत्रालयातून मंजुरी मिळविली. या सब स्टेशनसाठी बोटा ग्रामपंचायतीने गायरान असलेली एक एकर जागा ठराव करून वर्गही केल्याने या वीज केंद्रास प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे घारगाव ऐवजी आता बोटा येथील तळपेवाडी येथ होणाऱ्या वीज उपकेंद्रातून बोटा परिसरातील १५ गावांना वीज पुरवठा होणार आहे. वीज उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थांनी फटाके वाजवून जल्लोष केला. आमदार थोरात यांनाही धन्यवाद दिले.

कोट – एक तपापासून बोटा परिसरात कमी दाबाने वीज मिळत होती. घारगाव येथील उपकेंद्रांतून वीज मिळत असल्याने कमी दाबामुळे १० मिनिटांत वीजपंप ट्रिप होत होते. त्यामुळे उन्हाळ्यात पिकांना धोका होत असे. काही गावांमध्ये वीज नसल्याने रात्री रॉकेलचे दिवे पेटवावे लागत असत. मी सरपंच झाल्यावर ग्रामसभेचा ठराव घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाऊन वीज केंद्रासाठी पाठपुरावा केला व वीज केंद्र मागील आठवड्यात थोरात यांनी मंजूर करून आणले. मंत्री बावनकुळे यांनीही आम्हाला या कामी मदत केली. अंधारातून प्रकाशाकडे वस्त्यांची वाटचाल होत असल्याने आम्ही ग्रामस्थ आनंदी आहोत.
– विकास शेळके, सरपंच, बोटा

कोट – बोटा व परिसरातील १५ गावे, वाड्या वस्त्या विजेअभावी अडचणीत आल्या होत्या. शेतकरी हवालदिल झाले होते; मात्र, आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे जाऊन साडेचार कोटींचा वीज उपकेंद्राचा प्रस्ताव मंजूर करून आमच्या परिसराला न्याय मिळवून दिला आहे.
– सुहास वाळूंज, सामाजिक कार्यकर्ते

कोट – बोटा येथील वीज उपकेंद्राला सरकारने व ऊर्जा विभागाने मंजुरी दिली असून कामाची निविदाही काढण्यात आली आहे. त्यामुळे कामाला लवकरच सुरुवात होईल. या प्रकल्पासाठी ४.५ कोटी रुपये निधीही प्राप्त झाला आहे.
– एस. डी. सूर्यवंशी, वीज कंपनी, संगमनेर

Check Also

fadnavis

मराठा आरक्षण देणारच : देवेंद्र फडणवीस

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‌विधानसभेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *