facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / यशवंतराव चव्हाणांचे कार्य प्रेरणादायी
aawaz-news-image

यशवंतराव चव्हाणांचे कार्य प्रेरणादायी

आवाज न्यूज नेटवर्क –

नाशिक – यशवंतराव चव्हाण हे एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी खेड्यापाड्यांतील सामान्य माणसाचा विकास कसा होईल याला गती देण्याचे काम केले. देशावर वेळोवेळी आलेल्या संकटांच्या वेळी ते मदतीला धावून आले. त्यांचे कणखर नेतृत्व आणि कौशल्यपूर्ण कार्यपद्धती महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला आजही प्रेरणादायी असून, देशाच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन अॅड. मयूर जाधव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर वित्त अधिकारी मगन पाटील, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्राचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाळे उपस्थित होते.

अॅड. मयूर जाधव म्हणाले, की मराठी भाषिकांच्या राज्याची निर्मिती करण्यात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांनी सहकार चळवळ वाढीस लावण्यासाठी दिलेले योगदान अतिशय मोठे आहे.

कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की यशवंतरावांचे शैक्षणिक व सामाजिक योगदान डोंगराएवढे आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते शिल्पकार असून, कृषी औद्योगिक धोरणाचे प्रणेते म्हणून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला ज्ञात आहेत. माणुसकी जपणारे ते थोर राजकारणी होते. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण आदी क्षेत्रांत स्वैरपणे भटकंती करणारे ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. एक सुसंस्कृत, धोरणी, प्रगल्भ, व्यासंगी राजकारणी म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. समाजातील सर्व घटकांचा विकास साधून हित जपणारा आधारस्तंभ असे यशवंतराव चव्हाणांचे वर्णन त्यांनी केले. विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्कप्रमुख संतोष साबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *