facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / आलास पाणी योजनेत अर्धा कोटींचा ‘ढपला’

आलास पाणी योजनेत अर्धा कोटींचा ‘ढपला’

आवाज न्यूज नेटवर्क –

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील आलास नळ पाणी पुरवठा योजनेत घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने केलेल्या चौकशी अहवालात काळी माती असताना कठीण खडक, ब्लास्टिंगचा वापर दाखवून ४९ लाख ८९ हजार ३५४ रूपये खर्च केल्याचे म्हटले आहे. परिणामी योजनेत गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

दरम्यान, या कामात सुमारे अर्धा कोटींचा ढपला मारल्याचा आरोप अकुंश संघटनेने केला आहे. संघटनेच्या तक्रारीवरून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा अकुंशच्या शिष्टमंडळाने सीइओ डॉ. कुणाल खेमनार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून आलाससाठी नळपाणी योजनेसाठी २०११ मध्ये २ कोटी ४९ लाख ७४ हजार ५६६ रूपये मंजूर झाले. योजना २३ नोव्हेंबर २०१३ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. कृष्णा नदीवरील या योजनेचे अंदाजपत्रक तयार करताना पाईपलाइन टाकण्यासाठी जमिन खुदाई करून चाचणी खड्डे घेतले. त्यात काळी माती आणि मुरूम असल्याचे दिसून आले. तरीही अंदाजपत्रकात कठीण खडक, ब्लास्टिंगसाठी तरतूद केली. योजनेतून सुमारे ६ किलोमीटरची पाइपलाइन टाकली. चाचणीवेळी काळी माती आढळली असताना ढपला मारण्यासाठीच कठीण खडकाचे आणि ब्लास्टिंगचे पैसे उचलले आहेत, अशी तक्रार ‘अकुंश’ने २२ जून २०१५ रोजी सीइओंकडे केली होती. त्याची चौकशी झाली.

चौकशी अहवालात म्हटले आहे की, अशुध्द पाणी दाबनलिकेवर चाचणी खड्डा खणला. त्यावेळी मुरूम बेडींग केलेले नसल्याचे दिसून आले. पाइपलाइनची खुदाई प्रत्यक्षात काळ्या मातीत केलेली आहे. पाईपलाइनवर कव्हर खूप कमी आढळले. त्याची पडताळणी केली असता ०.७५ मीटर खोली आवश्यक होती, पण कमी खोलीवर पाईप टाकली आहे. गावात सर्व ठिकाणी काळी माती आढळली. अशुध्द पाणी पंपिग म‌शिनरीमध्ये १५ एचपीचे दोन सबमर्सिबल पंप सुरू नाहीत. शुध्द पाणी पपिंग मशिनरीचे काम सुरू झालेले नाही. स्वयंचलित व्यवस्था, तारेचे कम्पाउंड नाही. अशा गंभीर त्रुटी चौकशीत दिसून आल्यामुळे योजनेतील घोटाळ्याबाबत संशय बळावला आहे.

पाइपलाइनच्या एका खुदाई कामात ४६ लाखांचा ढपला मारून सरकारचे नुकसान केले आहे. उर्वरित कामांची चौकशी केल्यानंतर आणखी गैरव्यवहार उघडकीस येतील. ज्या ‌कामात ढपला मारण्याची संधी जास्त आहे, ते काम प्राधान्याने केले आहे. जेथे संधी नाही, ते काम मागे ठेवले आहे. दोषींवर कारवाई करण्यासही टाळाटाळ केली जात आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करणार आहोत.

धनाजी चुडमुंगे, अध्यक्ष, अंकुंश संघटना

आलास पाणी योजनेची चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जादा पैसे अदा केले असतील तर वसूल केले जातील.

एस. एस. शिंदे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *