facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / Featured / बोरुडेंना उमेदवारीमुळे भाजपचा विजय सुकर

बोरुडेंना उमेदवारीमुळे भाजपचा विजय सुकर

आवाज न्यूज नेटवर्क –

अहमदनगर – विद्यमान आमदार मोनिका राजळे व माजी आमदार राजीव राजळे यांनी केलेली प्रतिष्ठेची निवडणूक आणि भाजप उमेदवार डॉ. मृत्युंजय गर्जे यांचा असलेला फ्रेश चेहरा व विरोधात असलेले दोन मराठा उमेदवार या मुळे पालिकेची सत्ता एकहाती जिंकण्यात भाजपला यश मिळाले.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या बारा जागा जिंकून भाजपने बहुमत मिळविले. पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या बाजार समिती निवडणुकीत प्रताप ढाकणे व चंद्रशेखर घुले गटाने जगदंबा विकास आघाडीची स्थापना करत तीस वर्षांनंतर समितीची सत्ता ताब्यात घेण्यात यश मिळवले असल्याने आघाडीचे मनोधैर्य या निवडणुकीत वाढले होते. वाढलेल्या या मनोधैर्यावर आपण पालिकेची निवडणूक आघाडी करून जिंकायची, असा निर्धार करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह नाकारत कपबशीच्या चिन्हाला पसंती दिली; मात्र, या आघाडीमध्ये पूर्वी असलेले सेना व मनसेचे नेते सहभागी न झाल्याने निवडणुकीपूर्वीच आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. आघाडीविरोधात असलेल्या पक्षांनी घड्याळ कोठे गायब झाले, याची विचारणा केली; मात्र, शेवटपर्यंत समाधानकारक उत्तर आघाडीच्या नेत्यांना देता आले नाही.

आघाडीने रणनीती ठरवताना नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे अभय आव्हाड असतील, असे गृहीत धरून आव्हाड यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचे धोरण ठेवत प्रत्येक सभेत आव्हाड यांच्या विरोधात टीका केली; मात्र, आव्हाड यांनी स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणे पसंत न करता भाजपच्या पॅनेलमध्ये आपल्या पुतण्याला उभे करून भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मृत्युंजय गर्जे यांची साथ करण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीने आव्हाडांविरोधात केलेली टीका मतदारांना भावली नाही. या उलट आव्हाड आघाडीच्या टीकेने आणखी व्यथित झाले व त्यांनी गर्जे यांना साथ दिल्याने गर्जे यांचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला. मोनिका राजळे यांनी विधानसभा निवडणूक आहे, असे गृहीत धरून पालिका हद्दीतील सर्वच मतदारांच्या जवळपास दोन वेळा भेटी घेत मतदासंघ ढवळून काढला. तर राजीव राजळे यांनी अनेक चौकसभा घेत प्रचार सुरूच ठेवल्याने भाजपचा प्रचार एका रेषेत सुरू राहीला.

या उलट स्थिती ही आघाडीची झाली. घड्याळाचे चिन्ह नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही राज्यपातळीवरील नेते प्रचाराकडे फिरकले नाहीत, तसेच चंद्रशेख घुले हे सुद्धा पाहीजे तसे या निवडणुकीत सतर्क राहीले नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी एक आठवडा अगोदर भाजपकडून अभय आव्हाड, बजरंग घोडके, अमोल गर्जे व डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. फ्रेश चेहरा म्हणून गर्जे यांच्या नावाला राजळेंनी हिरवा कंदील दाखवला. तर आव्हाड यांचे खंदे समर्थक बंडू बोरुडे यांनी ऐनवेळी काँग्रेसचे दार उघडत उमेदवारी मिळवली. आघाडीकडून डॉ. दीपक देशमुख व बंडू विठ्ठल बोरुडे यांची नावे चर्चेत होती. बोरुडे हे आधीपासून सक्रिय असल्याने तसेच ते घुले समर्थक असतानाही त्यांनी ढाकणेंशी जुळवून घेतल्याने उमेदवारी त्यांना मिळाली; मात्र, आघाडीने डॉ. देशमुख यांना उमेदवारी दिली असती तर भाजपची दमछाक झाली असती. भाजपविरोधात असलेले दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे असल्याने मतविभागणी अटळ ठरली; मात्र, मराठा समाजाची मते फुटू नयेत याची दक्षता शेवटपर्यंत राजळेंनी घेतल्याने त्याचा फायदा गर्जे यांना झाला. गर्जे यांची राजकारण विरहीत प्रतिमा असल्याने ते प्रबळ दावेदार होऊच शकत नाहीत, या भ्रमात काँग्रेस व आघाडीची नेतेमंडळी राहिली; मात्र, गर्जे यांनी ढाकणे यांच्यासोबत अनेक निवडणुका हाताळल्या असल्याने त्यांनी आपल्या पद्धतीने ही निवडणूक हाताळल्याने दोन हजारहून अधिक मताधिक्य त्यांनी घेतले. ही निवडणूक एकतर्फी झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *